ठाणे शहर पोलीस आणि महापालिकेचे पाऊल

ठाणे : ठाणे शहर पोलिसांनी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने पोलिसांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनीही करोनाची लागण होण्याची भीती असते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२० मध्ये सुरू झाला होता. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये यासाठी पोलिसांकडून संपूर्ण राज्यात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणे शहर पोलीस दलाकडूनही ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताच्या कालावधीत शहर पोलीस दलातील सुमारे अडीच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. एक पोलीस अधिकारी आणि ३४ पोलीस अंमलदारांचा मृत्यू झाला होता. काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाची लागण झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे पोलिसांना शहरात पुन्हा एकदा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात वृद्ध आई-वडील आहेत.

राज्य सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिली असली तरी पोलीस कर्मचारी स्वत: बंदोबस्तावर असल्याने त्यांना आई-वडिलांना लसीकरणासाठी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला करोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेकडे पोलिसांच्या कुटुंबीयांचेही लसीकरण करावे, अशी मागणी शहर पोलीस दलाकडून केली जात होती. त्यानुसार शुक्रवारपासून दरररोज पोलीस कुटुंबातील १०० जणांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. कल्याण, उल्हासनगर, भिवंडी भागांत राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनाही ठाण्यात यावे लागत आहे. त्यांनाही त्यांच्या शहरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. करोना काळात ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या पत्नींना केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती. मुंबई महानगर क्षेत्रात पोलीस कुटुंबीयांच्या लसीकरणाचा हा पहिलाच उपक्रम आहे.

डॉक्टरांच्या मदतीला ‘पोलीस परिचारिका’ 

ठाणे शहर पोलीस दलात सुमारे १० हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे पोलिसांच्या पत्नी आणि त्यांच्या आई-वडिलांचे लसीकरण केले जात आहे. त्यांची संख्या सुमारे ५ हजार इतकी आहे. राज्यात आरोग्य सेवकांचा तुटवडा आहे. त्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा भार येऊ नये म्हणून परिचारिकेचे प्रशिक्षण घेतलेल्या, मात्र सध्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. शिवाय पोलीस दवाखान्यातील डॉक्टरांचीही मदत घेण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शहर पोलीस दलातील पोलिसांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस कुटुंबीयांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांत उल्हासनगर, भिवंडी आणि कल्याण शहरातही अशा प्रकारे लसीकरण केंदे्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. – प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त.