अंबरनाथमधील केंद्रे मात्र बंदच
ठाणे : अतिवृष्टी आणि लससाठ्याच्या तुटवड्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात बंद असलेली लसीकरण केंद्रे अखेर सोमवारी सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात लशीच्या कमतरतेमुळे अंबरनाथ शहरातील लसीकरण केंद्रे मात्र बंद राहणार आहेत. तर, इतर शहरातही काही मोजकीच लसीकरण केंद्रे  सुरू राहणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याला गुरूवारी ३१ हजार २४० लशींचा साठा उपलब्ध झाला. परंतू, हा साठा पुरेशाप्रमाणात नसल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे ठाण्यापलिकडच्या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पाश्र्वाभूमीवर भिवंडी आणि ठाणे ग्रामीण वगळता इतर सर्व शहरातील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. पाऊस ओसरल्यानंतर अखेर सोमवारी जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

ठाणे शहरात ५८ लसीकरण केंद्रे सुरू राहणार असून यापैकी ५४ केंद्रांवर लशीची पहिली आणि दुसरी मात्रा तर, इतर केंद्रांवर केवळ लशीची दुसरी मात्रा देण्याचे ठाणे महापालिकेचे नियोजन आहे. कल्याण – डोंबिवली शहरात लशीच्या अपुऱ्या साठ्यामुळे केवळ दोन फिरती लसीकरण केंद्रे सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.

भिवंडी शहरात पाच पैकी दोन, उल्हासनगरमध्ये चार तसेच बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागातही काही मोजकी लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत. अंबरनाथमध्ये मात्र लसीकरण केंद्रे बंद राहणार आहे.

ठाणे शहरात ५८ लसीकरण केंद्रांवर आजपासून लसीकरण.

 कल्याण – डोंबिवलीत लस तुटवड्यामुळे  केवळ दोन फिरत्या केंद्रांद्वारे लसीकरण