तुटवड्यामुळे उर्वरित केंद्रेही बंद होण्याची भीती

ठाणे : गेल्या आठवड्यात लस उपलब्ध नसल्याने ठप्प झालेले लसीकरण कसेबसे सुरू झाले, मात्र आता पुन्हा लस कुप्यांचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी एक ते दोन दिवस पुरेल इतकाचा लशींचा साठा असून ती केंद्रेही बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषत: जिल्ह्यात कोविशिल्ड लशींचा तुटवडा सर्वाधिक जाणवत आहे.

त्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी वणवण फिरावे लागत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी ठाणे जिल्ह्यात मात्र लशींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत.

ठाणे शहर

 केवळ पाच केंद्रांवर लसीकरण

ठाणे महापालिका क्षेत्रात ५६ लसीकरण केंद्रे आहेत. गेल्या काही दिवसांपासून लशींच्या अपुऱ्या साठ्यामुळे पालिकेला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. पालिकेला बुधवारी कोविशिल्ड लसीचे ३ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यामुळे पालिकेच्या पाच केंद्रांवर केवळ लसीकरण सुरू आहे. शुक्रवारी पालिकेकडे कोविशिल्डचे २ हजार, तर कोवॅक्सिनचे दीडशे डोस केवळ शिल्लक होते. हे डोस दिवसभरात संपतील आणि नवीन डोस उपलब्ध झाले नाहीत तर केंद्रे बंद ठेवावी लागतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्यही शुक्रवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. तसा फलक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला होता.

ठाणे ग्रामीण

एक दिवसाचा साठा

३ हजार ४८० कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध असून तो एक दिवस पुरेल इतकाच आहे, तर ५ हजार ४४० कोवॅक्सिनचा लशींचा साठा उपलब्ध असून तो दोन दिवस पुरेल इतकाच आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कल्याण-डोंबिवली

सात केंद्रांवर लसीकरण

शहरात १६ लसीकरण केंद्रे आहेत; परंतु पालिकेकडे कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे ८ ते ९ केंद्रे पालिकेने शुक्रवारी बंद ठेवली होती, तर, उर्वरित केंद्रांवर कोवॅक्सिनचा दुसरा डोस सुरू होता.

भिवंडी

 सहा दिवसांचा साठा

शहरात ६ हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध असून हा साठा सहा दिवस पुरेल इतका आहे.

अंबरनाथ

केंद्र बंद

शहरात एक लसीकरण केंद्र असून या केंद्रांवर लस उपलब्ध नसल्यामुळे बंद ठेवले होते.

बदलापूर  साठा संपला

शहरात ९० कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध होता. हा साठा दिवसभर पुरेल इतकाच होता.

उल्हासनगर

दिवसभर पुरेल इतकाच साठा

शहरात ९ लसीकरण केंद्रे असून या केंद्रांवर ९०० कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध होता. हा साठासुद्धा दिवसभर पुरेल इतकाच होता.

नवी मुंबई लसीकरण पूर्ण ठप्प नवी मुंबईतील लसीकरण गुरुवारपासून मंदावले असून शुक्रवारी शहरातील लसीकरण मोहीम पूर्णपणे ठप्प होती.

ठाणे जिल्ह्याला आवश्यक तितका लशींचा साठा उपलब्ध होत नसून हा साठा जास्तीत जास्त कसा उपलब्ध होईल यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच शुक्रवार रात्रीपर्यंत जिल्ह्याला ५० हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध होईल. – डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, आरोग्य विभाग, ठाणे जिल्हा