अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम थंडावल्याचे समोर आले आहे. लशींचा साठा उपलब्ध नसल्याने गेल्या आठवडाभरात तब्बल पाच दिवस लसीकरण केंद्र बंद पडले होते. तर अवघे दोनच दिवस लसीकरण करता आले. लशींसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गेल्या आठवडाभरात अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही लसीकरण केंद्रांवर अवघे तीनच दिवस लसीकरण शक्य झाले आहे. अंबरनाथ शहरात पश्चिम भागात आयुध निर्मितीमध्ये सर्वात पहिले लसीकरण केंद्र सुरू झाले. याच ठिकाणी दररोज सरासरी ३०० लशी दिल्या जात होत्या. कालांतराने येथे गर्दी वाढू लागल्याने पालिका प्रशासनाने पूर्व भागात एका खासगी रुग्णालयात लशीची दुसरी मात्रा देण्यासाठी केंद्र सुरू केले. ते काही दिवसांतच बंद पडले. त्यामुळे आतापर्यंत शहरात १९ हजार ९७१ इतक्या जणांना लशींची मात्रा देता आली आहे. त्यात ३० एप्रिल आणि २, ३, आणि ४ मे रोजी अंबरनाथ शहरातील लसीकरण लशींअभावी ठप्प होते. त्यामुळे या दिवसांत ४५ वयावरील नागरिकांना लशींशिवाय घरी माघारी परतावे लागले. बदलापूर शहरात चार लसीकरण केंद्रे असली तरी गेल्या आठ दिवसांत पाच दिवस लसीकरण बंद होते. बदलापुरात २८ आणि २९ एप्रिल तसेच २, ३ आणि ४ मे रोजी लसीकरण बंद होते. तर २७ व ३० एप्रिल तसेच १ मे रोजी लसीकरण सुरू होते. त्यामुळे आतापर्यंत बदलापूर शहरात १५ हजार १३ नागरिकांना लस देता आली आहे.

अवघ्या ३.२९ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा

५ हजार ८४३ नागरिकांनी कोविशिल्ड लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ३ हजार ७२८ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. अंबरनाथ शहराची साधारण लोकसंख्या साडेतीन ते चार लाख आहे. त्या तुलनेत अवघ्या ४ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा तर ०.९३ टक्के नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतला आहे. बदलापूर शहरात ११ हजार ५४४ नागरिकांनी आतापर्यंत लशीची पहिली मात्रा घेतली आहे. तर ३ हजार ४६९ नागरिकांनी लशीची दुसरा डोस घेतला आहे. बदलापूर शहराच्या तीन ते साडेतीन लाख लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या ३.२९ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर ०.९९ टक्के नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे.