|| पूर्वा साडविलकर

गैरसमजातून कमी प्रतिसाद; जिल्हा प्रशासनाकडून नव्याने प्रयत्न

ठाणे : शहरी भागात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अनेकदा खंड पडत असतानाच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गैरसमजांचा आणि काही ठिकाणी अंधश्रद्धेचा अडथळा ठरू लागला आहे. जिल्ह्यातील काही गावे, पाड्यांमध्ये लस घेण्यास अजूनही पुरेशा प्रमाणात रहिवासी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्रावर गेल्यास आपल्याला इतरांकडून संसर्ग होईल, अशा भीतीनेही अनेकांना पछाडले आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून काही भागांत लसीकरण थंडावले असल्याचे चित्र आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या ग्रामीण तालुक्यांमधील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. ग्रामीण भागात साधारणत: १५ लाख लोकसंख्या असून आतापर्यंत आरोग्यसेवक, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि ४५ वर्षांवरील अशा एकूण ७३ हजार ६४४ नागरिकांनीच लस घेतली आहे. जिल्ह्यातील शहरी भागात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असली तरी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत गैरसमज असल्याचे निदर्शनास येत आहे. या भागातील नागरिकांमध्ये अद्याप लसीकरणाविषयी फारशी सकारात्मकता नसल्याचे जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. लसीकरण केंद्रावर गेल्यास तेथील रहिवाशांमुळे आपल्याला करोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेही अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांमध्ये काही ठिकाणी गैरसमज असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना देण्यात येणारी लस पूर्णत: सुरक्षित असून लाभार्थी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. – डॉ. रुपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद