‘व्हॅलेंटाईन डे’निमित्ताने बाजारपेठा गुलाबी; विविध प्रकारच्या भेटवस्तूंची यंदाही ‘क्रेझ’ कायम

यंदा‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आपल्या प्रियकर वा प्रेयसीला काही हटके गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर बाजारात सध्या जम्बो भेटकार्डाची फॅशन ‘इन’ आहे. या भेटकार्डाबरोबरच आयफेल टॉवरची प्रतिकृती भेट देऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीचे प्रेम नक्कीच जिंकू शकता.

प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि साजरे करण्यासाठी हक्काचा दिवस समजला जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’साठी अवघा आठवडा उरला आहे. आपल्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन खूश करण्यासाठी तरुणाईची पावले बाजारपेठा, दुकानांकडे वळू लागली आहेत. या दिवसासाठी अनेक तरुण-तरुणी खिसा ढिला करण्यासाठी तयार असल्याने दुकानदारांनाही नफा कमवण्याची आयतीच संधी मिळाली आहे. नेहमीपेक्षा काही तरी हटके पर्याय दुकानदारांनी तरुण ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. या पर्यायांपैकी एक म्हणजे जम्बो भेटकार्ड व आयफेल टॉवरची प्रतिकृती. ताजमहाल भेट देऊन आपल्या प्रेयसीला मुमताजची उपाधी देण्याचा ट्रेण्ड केव्हाच जुना झाला. त्याऐवजी सध्या फॅशन आहे ती आयफेल टॉवरची.

प्रेमाचं डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर बघण्याचं स्वप्न रंगवतानाच खरा आयफेल टॉवर नाही तर निदान प्रतिकृती तरी भेटवस्तू म्हणून देण्यासाठी तरुणाईची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे. त्यातच प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाब बाजारात ठिकठिकाणी दिसत असून विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी त्याची जास्त खरेदी करत असल्याचं चित्र आहे. चॉकलेट्स, शुभेच्छापत्रके या ठरलेल्या भेटवस्तूंनीही दुकाने गच्च भरली आहेत.

गुलाबी बाजारपेठा

लाल गुलाब मुबलक प्रमाणात बाजारात दाखल झाल्याने बाजाराने लाल चादर ओढल्याचे दृश्य सध्या दिसत आहे. बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या मळ्यातून ही मागवली जात असल्याचे गुलाब विक्रेत्यांनी म्हटले.

सुरक्षाही कडक

‘व्हॅलेंटाइन डे’ साठी पोलीस सज्ज झाले असून शहरातील महाविद्यालये, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, उद्याने येथे पोलीस सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल.

आवाक्याच्या बाहेर तरीही खिशाच्या आत

  • विविध प्रकारची चॉकलेट्स – ४० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत
  • मराठी आणि इंग्रजी शुभेच्छापत्रके – ४० रुपयांपासून ते ६५० रुपयांपर्यंत
  • चॉकलेट्स बॉक्स – २०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत
  • लहान-मोठय़ा आकाराचे टॉवर – १५० ते ९०० पर्यंत

यंदा बाजारपेठेमध्ये भेटवस्तू देण्यासाठी आयफेल टॉवरच्या प्रतिकृती उपलब्ध असून तरुणाईचा कल अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याकडे जास्त आहे.

रोहन पाटील, दुकानदार