आशीष धनगर

काटेसावर, पळस फुलल्याने परिसरात विविध पक्ष्यांची हजेरी

ठाणे शहराला लागून असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकीकडे उन्हाच्या कडाक्याने पाने झडून झाडे उजाड होत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे काही झाडांना मात्र चैत्रपालवीचा बहर आल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या या झाडांवरच्या फुलांतील मकरंद शोषून घेण्यासाठी या ठिकाणी नव्या पक्ष्यांचा राबता वाढला आहे.

एका बाजूला खाडीकिनारा तर दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशी निसर्गसंपदा लाभलेल्या ठाणे शहराचा विस्तार जुने ठाणे ते नवे ठाणे असा होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आजही निसर्गसंपदा टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या पर्यटकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडय़ापासून तापमानात वाढ होत असून उकाडय़ापासून संरक्षण करण्यासाठी माणसासोबत पशुपक्षीही सावलीच्या शोधात असतात असे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. येऊरच्या जंगलातील काही झाडांना गळती लागली असली तरी काटेसावर, पळस, कौशी, सरडोल, महुवा आणि चाफा अशा विविध झाडांनी पिवळा, सोनेरी, लाल आणि हिरवा असे अनेक रंग धारण केले आहेत. झाडांवरच्या या रंगांकडे आकर्षित होऊन विविध पक्षी या झाडांवर विसावा घेण्यासाठी येत असल्याचे वन्य अभ्यासक आशुतोष जोशी यांनी सांगितले.

पर्यटक, पक्षीप्रेमींची गर्दी

पाना-फुलांनी बहरलेल्या झाडांवर येऊन फुलांमधील मकरंद शोषून घेण्यासाठी अनेक छोटे कीटक या झाडांवर वास्तव्य करतात. या लहान कीटकांना खाण्यासाठी पर्णपक्षी, राखाडी कोतवाल, भृंगराज, जांभळा शिंजीर, लोटेनचा सूर्यपक्षी, टिकेलचा फुलटोच्या, पिवळ्या कंठाची चिमणी, तोईपोपट आणि कंठवाला पोपट अशा विविध पक्ष्यांचे दर्शन या झाडांवर होत असल्याचे वन्य अभ्यासक सम्राट गोडांबे यांनी सांगितले. त्यामुळे बहरलेली फुले, लहान कीटक, विविध जातीचे कोळी आणि विविध पक्ष्यांमुळे वन्यप्रेमी आणि अभ्यासक येऊरच्या जंगलात भेट देत आहेत.