23 March 2019

News Flash

पूर्वमोसमी फुलांचा बारवीच्या जंगलात बहर

मान्सून सुरू झाला की पर्यावरणप्रेमींना विविध डोंगरांवरील जंगल सफारीचे वेध लागतात.

विविध प्रजातींची फुले, औषधी वनस्पतींमुळे निसर्गसौंदर्यात भर

मान्सून सुरू झाला की पर्यावरणप्रेमींना विविध डोंगरांवरील जंगल सफारीचे वेध लागतात. मात्र बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या बारवीच्या जंगलात मान्सूनपूर्व फुलांना बहर आला आहे. मान्सूनच्या आधी उगवणारी विविध प्रजातीची फुले, वेली जंगलात आपले अस्तित्व दाखवून देत असून काही दिवस बहरणारी ही फुले पाहण्यासाठी निसर्गप्रेमी जंगलात हजेरी लावत आहेत.

मान्सूनचा अंदाज वर्तवण्याची वेधशाळेची पद्धत अद्ययावत आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असली तरी विविध प्रकारे निसर्ग त्याचे संकेत देत असतो. मान्सूनपूर्व परिस्थितीत मान्सूनची चाहूल देणारे प्राणी, फुले, किडे मान्सूनचे संकेत देत असतात. याचा अनुभव घेण्याची संधी सध्या बदलापूरकरांना मिळते आहे. बदलापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले बारवीचे विस्तीर्ण जंगल पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सध्या या बारवीच्या जंगलात मान्सूनपूर्व फुलांचा बहर आला आहे. औषधासाठी वापरली जाणारी मुसळी, त्यातही सफेद मुसळी, लिली प्रकाराच्या फुलांतील पांढरी लिली, लेव्हेंडर लिली, सजावटीसाठी उपयोगी येणारे ऑर्डची फुले अशी अनेक प्रजातींची फुले सध्या बारवीच्या जंगलाची शोभा वाढवत आहेत. मान्सून सुरू होण्याच्या पूर्वी ही विविध प्रकारची फुले उगवत असतात. मान्सून सुरू होण्यापूर्वीचा पाऊस हा या फुलांसाठी महत्त्वाचा असतो. मात्र नंतर मान्सूनच्या काळात वाढलेल्या इतर वनस्पती, वेली यात ही फुले नष्ट होतात, अशी माहिती जंगल अभ्यासक सचिन दाव्‍‌र्हेकर यांनी दिली आहे. ही फुले बहरण्याचा कालावधी अवघा सात ते दहा दिवसांचा असतो. त्याच काळात हा नैसर्गिक ठेवा अनुभवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

निसर्गसोहळा कुठे?

  • बदलापूर शहराबाहेर बारवी धरण रस्त्याला मुळगावच्या पुढे फुलांना बहर.
  • धरणाच्या मागे, जंगलात व बोराडपाडा रस्त्याला फुले.
  • चिखलोली धरणामागे टावळीच्या डोंगर पायथ्याशी साज.

First Published on June 14, 2018 1:47 am

Web Title: various flower in market