ठाणे महापालिकेची उपायांची जंत्री केवळ कागदावरच; निष्काळजीपणाच्या तक्रारी

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत करोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या उपयांची जंत्री कागदावर मांडली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र या लढय़ाला गोंधळाची किनार दिसू लागली आहे. संशयित रुग्णांचे अहवाल येण्यास लागणारा वेळ, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाला अलगीकरण अथवा उपचारांसाठी दाखल करण्यात सुरू असणारा सावळागोंधळ, अशा रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात अथवा संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या अलगीकरणात दाखविला जाणारा निष्काळजीपणाच्या असंख्य तक्रारी आता पुढे येऊ लागल्या असून अशाने ही साखळी कशी अटोक्यात आणली जाणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल दररोज अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना तसेच आदेश देत आहेत. करोनाबाधित रुग्ण आढळून येताच अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २० जणांना विलगीकरण कक्षात ठेवले जावे तसेच घरोघरी जाऊन तपासणी करून त्यात ताप असलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवावे अशा सूचना यापूर्वीच आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. कागदावर हे आदेश उत्तम दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणीतील गोंधळ इतका मोठा आहे की रुग्ण, नातेवाईक आणि परिसरातील रहिवाशी दाद कोठे मागायची या विवंचनेत दिसू लागले आहेत.

गोंधळाचे प्रसंग

’ गोकुळनगरमध्ये करोनाची लागण झालेली एक व्यक्ती १५ दिवसांनंतर बरी होऊन घरी परतली. त्यानंतर पालिकेने या ठिकाणी धाव घेऊन त्याच्या शेजाऱ्यांना विलगीकरण कक्षात नेण्याची कारवाई सुरू केली. त्याला स्थानिकांनी विरोध केला. १५ दिवसांपूर्वी सापडलेला रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांचे विलगीकरण करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यात आला. त्यामुळे पालिकेचे पथक रिकाम्या हाती परतले, अशी माहिती स्थानिक नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली.

’ आझादनगर येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने कळवा रुग्णालयात करोना चाचणी केली होती. सात दिवसांपूर्वी रुग्णालयातून त्यांना करोनाची लागण झाल्याचे कळविले होते. त्यानंतर ते कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तर त्यांच्या कुटुंबीयांना गृह विलगीकरणात ठेवून परिसर सील केला होता. सात दिवसानंतर त्यांना करोनाचा चुकीचा अहवाल देण्यात आला असून त्यांना करोनाची लागण झालेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कुटुंबीयांना कळविण्यात आले. तसेच त्यांना घरी नेण्यास सांगितले. सात दिवस कोव्हिड रुग्णांसोबत राहिल्याने कुटुंबीयांनी चाचणीनंतरच घरी नेण्याचा आग्रह धरला. अखेर रुग्णालय प्रशासनाने त्यांना आनंदनगर येथील विलगीकरण कक्षात दाखल केले.

’ घोडबंदरमधील एका गृहसंकुलातील व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर त्याने पालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास उलटूनही त्यांना पालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. २४ तास उलटून गेल्यानंतर ढोकाळी आरोग्य केंद्रातून संबंधितास दूरध्वनी आला खरा, मात्र रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रियाही वेळकाढूपणाची होती, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

अधिकारी उदंड

ठाण्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात यावी यासाठी शासनाने आयुक्तांच्या मदतीला दोन सनदी अधिकारी पाठविले आहेत. याशिवाय दोन नव्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी एक अतिरिक्त आयुक्त स्वत आजारी असून कोविड विभागासाठी विशेष अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले डॉ. आर. टी. केंद्रे यांच्या कामातील सावळागोंधळाविषयी पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. हा गोंधळ आवरण्यासाठी शासनाने डॉ.चारुदत्त िशदे यांची विशेष अधिकारी म्हणून ठाण्यात रवानगी केली आहे.

या संदर्भात माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या व्यक्तींना उपचाराची गरज आहे, त्यांना संपर्क साधून मार्गदर्शन केले जाईल.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका