नोकरी-व्यवसायातून निवृत्तीनंतरही स्वत:सुखाय अनेकजण विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यातून त्यांना आनंद मिळतोच, शिवाय इतरांनाही त्याचा फायदा होतो. उतारवयातही सकारात्मक उपक्रमात कार्यरत असणाऱ्या ठाणे परिसरातील ज्येष्ठांच्या कार्याची दखल घेणारे हे नवे पाक्षिक सदर..
डोंबिवलीच्या वर्षां गोडसे यांनी जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या ठाण्यातील मो.ह. विद्यालयामधून १९९३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. १९६९ मध्ये याच संस्थेच्या कल्याण येथील सुभेदार वाडा शाळेतून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षे याच संस्थेच्या स. वा. जोशी हायस्कूल (डोंबिवली) येथेही त्या होत्या. इंग्रजी, संस्कृत, मराठी हे त्यांचे अध्यापनाचे विषय होते. स्वेच्छानिवृत्तीनंतर २००० पर्यंत त्यांनी घरी शिकवणी वर्गही चालविले.
त्यांना पहिल्यापासूनच फिरणे, वक्तृत्व याची आवड होतीच. नोकरीच्या काळात काम, घर-संसार, बेताचे आर्थिक उत्पन्न यामुळे म्हणावे तसे फिरणे होऊ शकले नव्हते. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर २००० मध्ये त्या त्यांच्या नणंदेकडे नात्यातील काही महिलांबरोबर पठाणकोट येथे गेल्या होत्या. तिकडे गेल्यानंतर आजूबाजूला फिरणे झाले. या सगळ्यात गोडसेबाई यांचा पुढाकार होता. त्यांची ती सहल खूप छान झाली. नंतर पुन्हा कधी सगळ्यांचे भेटणे झाले की त्या सहलीच्या आठवणी निघायच्या. यातून आपण दरवर्षी सगळ्याजणींनी एकत्र कुठेतरी जाऊ या, अशी कल्पना पुढे आली आणि पुढाकार घेण्याची सगळी जबाबदारी साहजिकच गोडसेबाईंवर आली.
पठाणकोटला गेलेल्या आणि काही अन्य ओळखीच्या महिलांना बरोबर घेऊन त्यांनी २००१ मध्ये एका ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून केरळ येथे पहिली सहल नेली. पहिलीच सहल असल्याने त्यांनी सावधगिरी म्हणून ट्रॅव्हल एजंटच्या माणसाला सोबत घेतले होते. त्या अनुभवानंतर पुढची सहल त्यांनी हैदराबाद येथे नेली. त्या काळात विमानाने जाणे, त्याचे सगळे नियोजन करणे ही कामे त्यांनी केली. त्याचे एक अप्रूप सगळ्यांना होते. सर्व नियोजन चोख केलेले असल्याने साहजिकच सहल उत्तम पार पडली. आपण एकटय़ा सर्व समवयस्क महिलांना सोबत घेऊन यशस्वीपणे लांबवर फिरून येऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांना मिळाला.
सहलीतील सहभागी महिलांनी त्यांच्या नात्यात, परिचयात गोडसेबाई यांच्या सहलीच्या उपक्रमाविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. यातून सहली व यशस्वी नियोजनाची ख्याती हळूहळू सर्वदूर पसरली आणि त्यांनी एखादी सहल ठरवली की त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. यातून कोणतीही कमाई करायची नाही, हा व्यवसाय म्हणून करायचे नाही, हे त्यांनी पहिल्यापासून ठरविले. सहलीच्या निमित्ताने त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, पुरी, कोणार्क, गंगटोक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे पालथी घातली आहेत. आजवर लहान-मोठय़ा अशा ४८ सहलींचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. वर्षांतून साधारणपणे तीन सहली त्या काढतात. एक एका दिवसाची, एक १० ते १५ दिवसांची आणि एक चार ते सहा दिवसांची असे त्याचे स्वरूप असते. सहलीत वय वर्षे ६० ते ८० अशा महिलांचा सहभाग असतो.
सहलीपूर्वी जिथे जाणार आहोत त्या राज्यातील पर्यटन महामंडळाच्या कार्यालयाला कधी प्रत्यक्ष भेट देऊन तर कधी दूरध्वनीवरून सर्व माहिती त्या घेतात. अगोदर जी मंडळी जाऊन आली असतील त्यांच्याशी, त्या ठिकाणच्या स्थानिकांशी बोलून अभ्यास पक्का करतात. आता संगणक, माहितीच्या महाजालामुळे हे काम अधिक सुकर झाले आहे. खासगी हॉटेलपेक्षा त्या त्या राज्यातील शासकीय पर्यटन महामंडळाच्या यादीत असलेल्या हॉटेल्सची निवड करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. हे सगळे करताना निवास, जेवणखाण, फिरणे याच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे सहलीत सहभागी झालेल्यांनाही सहलीचा संपूर्ण आनंद मिळतो. इतर पर्यटन कंपन्या जी स्थळे दाखवितात त्यापेक्षा काही वेगळ्या स्थळांचाही समावेश गोडसेबाई आपल्या सहलीत आवर्जून करतात. या सर्व सहल आयोजनात त्यांना त्यांची जाऊ शामला गोडसे यांचा सक्रिय सहभाग व मोलाची मदत होते. सहलीची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचविणे, सहभागी महिलांना दूरध्वनी करणे, त्यांच्या संपर्कात राहणे, सर्व हिशेब चोख ठेवणे ही व अन्य सर्व कामे या जाऊबाई करतात. गोडसेबाईंच्या या छंदात त्यांना त्यांचे पती श्रीकांत, अमेरिकेत असलेला डॉक्टर मुलगा, मुलगी व जावई यांचेही संपूर्ण सहकार्य मिळते.
सहलीत सहभागी असणाऱ्या सर्व महिला ‘आजी’ गटातील असल्याने प्रत्यकीची काळजी घेणे, प्रवासात भांडणे, वाद होणार नाहीत याची खबरदारी घेणे, प्रसंगी रागावून, कठोर होऊन एखादा प्रसंग निभावून नेणे हे सगळे त्यांना करावे लागते. सहलीच्या या चमूला त्यांनी ‘भरारी’असे नाव दिले आहे.
सहलीत सहभागी झालेल्या प्रत्येकीचे परस्परांशी मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले असून त्या सर्व जणी काही निमित्ताने एकत्र भेटतात, गप्पा करतात. यातून त्या सर्व जणींना आत्मविश्वास व मानसिक आधार मिळाला आहे. सध्याच्या आपल्या माणसांच्याही दुरावण्याच्या काळात ही मैत्री, आधार, परस्परांबद्दलचा जिव्हाळा व आत्मविश्वास या सगळ्याजणींना नवी ‘भरारी’ देणारा ठरला आहे.

समयसूचकतेचे दर्शन
सहलीत कधी कधी आणीबाणीची परिस्थिती उद्भवते. अशा वेळी डोके शांत ठेवून त्यातून मार्ग काढावा लागतो. मध्य प्रदेशातील एका सहलीच्या वेळी राज ठाकरे यांना अटक झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. सहलीत ३० ते ३५ महिला सहभागी होत्या. त्यांना सुरक्षित घरी घेऊन जाण्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. यातून त्यांनी धीराने मार्ग काढला. त्या जबलपूरला राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आगारात गेल्या. तेथील स्थानक प्रमुखांशी बोलून त्यांनी नागपूपर्यंत परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था केली. त्याच वेळी एका खासगी ट्रॅव्हल कंपनीशी बोलून एक व्होल्वो बस नागपूर येथे बोलावून ठेवली. जबलपूरहून नागपूरला आल्यानंतर त्या व्होल्वो बसने सर्वजणी मुंबईत सुरक्षित घरी परतल्या.
शेखर जोशी shekhar.joshi@expressindia.com