05 March 2021

News Flash

वसईत बांगलादेशींचा वावर

नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील गास परिसरातील टाकीपाडा भागात मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय राहतात.

 

कोळीवाडा, वाल्मिकीनगर आणि टाकीपाडय़ात संदिग्धांचा संचार

वसई : पोलिसांच्या विशेष पथकाने विरारमधून पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचे जन्मदाखले सापडल्याने येथील कोळीवाडा, वाल्मीकी नगर व टाकीपाडय़ात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीयांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील टाकीपाडा परिसरासाठी पोलीस चौकीच्या उभारणीची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा आणि दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करून वसई-विरारमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड केली. या बांगलादेशींकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचे जन्मदाखले आढळून आल्यामुळे बांगलादेशींना बेकायदा साहाय्य करणारे स्थानिक पातळीवरचे अधिकारी तथा कर्मचाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

नालासोपाऱ्याच्या पश्चिमेकडील गास परिसरातील टाकीपाडा भागात मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय राहतात. यामध्ये अनेक जण गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असून काही तडीपार व्यक्तींचाही या भागात वावर असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत आहेत. या भागात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. चोरी, अमली पदार्थाचे बेकायदा सेवन, दादागिरी आदी प्रकार येथे वाढले असून मध्यंतरी बॉम्बस्फोटातील आरोपींना या भागातून अटक करण्यात आली होती. या परिसरात पोलीस चौकी उभारण्याचे आदेश राज्याच्या साहाय्यक महासंचालकांनी मार्च २०१७ मध्ये निर्गमित केलेले आहेत. मात्र अडीच वर्षे उलटूनही पोलीस चौकी निर्मितीच्या दिशेने काहीही प्रयत्न झाले नसल्याचे येथील जॉय फरगोज यांनी सांगितले.

वाल्मिकीनगरात गुन्हेगारांचे तळ

वसई कोळीवाडय़ानजीक असलेल्या वाल्मीकी नगरातही बेकायदा वस्ती वाढत आहे. या ठिकाणी कोण कुठून वास्तव्यास येत आहे याची कुठेही नोंद किंवा कल्पना नाही. येथे अनेक गुन्हेगार व बांगलादेशींचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. यातील अनेक जण अमली पदार्थाच्या व्यवहारात गुंतल्याचे सांगण्यात येते. वसई पोलिसांच्या धाडी या भागात पडत असल्या तरी संबंधितांकडे वास्तव्याचे दाखले तसेच रेशनकार्डही आढळून येत असल्यामुळे पोलीस पुढे कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आता या भागातील परप्रांतीयांकडे आढळणाऱ्या कागदपत्रांची शहानिशा करण्याची गरज विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

माझी आताच या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. परिसराची माहिती करून घेतलेली आहे. जिथे बेकायदा बाबी दिसून येतील, तेथे त्वरित कारवाई केली जाईल.

– अनंत पराड, पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे

 

टाकीपाडय़ातील परिस्थिती आम्ही अनेक वेळा पोलिसांना अवगत केली आहे. मात्र कार्यवाही काहीच होत नाही. अडीच वर्षे उलटूनही या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजकंटकांना एक प्रकारे बळ मिळत आहे. – जोस्पीन फरगोज, माजी नगरसेविका

 

टाकीपाडा परिसरात पोलिसांची वेळोवेळी गस्त असते. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. या भागासाठी आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर मनुष्यबळ उपलब्ध होऊन पोलीस चौकीचा प्रश्नही सुटेल.

– वसंत लब्धे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:08 am

Web Title: vasai bangladeshi citizen akp 94
Next Stories
1 एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणाऱ्यांना अटक
2 शिव मंदिराच्या प्रांगणात आजपासून कला, संस्कृतीचा जागर
3 ठाणे शहरात पाच नवे आठवडी बाजार
Just Now!
X