पोहोण्यास जाणाऱ्या पर्यटकांना धोका, जीवरक्षकांचाही अभाव
वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनाऱ्यावर पोहोण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा नुकताच बुडून मृत्यू झाला. समुद्रकिनारे धोकादायक असल्याचे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. किनाऱ्यावरील बेसुमार वाळूउपशामुळे वसई-विरारजवळील समुद्रकिनारे धोकादायक बनत चालले आहेत. त्याशिवाय समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात नसल्याने पर्यटकांसाठी हे किनारे असुरक्षित आहेत.
वसई-विरारमधील रानगाव, भुईगाव, कळंब, राजोडी, अर्नाळा आणि सुरुची या किनाऱ्यांवर मौजमजा करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पर्यटकांना समुद्रात उतरून पोहोण्याचा मोह काही आवरत नाही. बहुधा मद्यप्राशन करून पोहण्यास उतरतात. भरती असेपर्यंत कोणताही धोका निर्माण होत नाही; परंतु ओहोटीच्या वेळी पोहणारी व्यक्ती वेगाने खोल समुद्रात खेचली जाते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या सर्व भागात इशारेवजा फलक लावले आहेत. परंतु या फलकांकडे दुर्लक्ष करीत हे उत्साही तरुण समुद्रात उतरतात आणि आपला जीव गमावतात. अशा प्रकारच्या घटना वसईत अनेकदा घडल्या आहेत.
वाळूचोरीमुळे वसई परिसरातील समुद्र मोठय़ा प्रमाणावर खचला असून वाळूचोरीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रानगाव, भुईगाव, कळंब, राजोडी, अर्नाळा आणि सुरूची बाग या किनाऱ्यांवर ध्वनिवर्धकावरून पर्यटकांत जनजागृती किंवा सागरी जीवरक्षक तैनात केले तर या घटनांना आळा घालू शकतो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.