News Flash

वसईकरांकडून पारपंरिक खाद्यसंस्कृतीची जपणूक

ख्रिसमससाठी विविध पदार्थ बनवण्याची लगबग घराघरात सुरू असल्याचे चित्र वसईत पाहावयास मिळत आहे

नाताळनिमित्त घरीच विविध खाद्यपदार्थ

नाताळनिमित्त घरीच विविध खाद्यपदार्थ बनवण्यावर भर

नाताळ सणानिमित्त वसई पट्टय़ातील ख्रिस्ती कुटुंबांमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवात झाली आहे. सान्ने, फुगे, कलकल, मोदक, नारळी पाक आणि विविध प्रकारचे केक बनवण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे बाजारातून आयते खाद्यपदार्थ मागवण्याऐवजी घरीच हे पदार्थ बनवण्यावर जास्त भर दिला जात आहे. या खाद्यपदार्थाद्वारे वसईकर परंपरा आणि संस्कृतीची जपणूक करत आहेत.

ख्रिसमससाठी विविध पदार्थ बनवण्याची लगबग घराघरात सुरू असल्याचे चित्र वसईत पाहावयास मिळत आहे, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध प्रकारचे केक बनवण्यात वसईकर व्यग्र आहेत. दरवर्षी वसईकर ख्रिस्ती समाज केक हे घरीच बनवण्यास जास्त प्राधान्य देतात. त्यामध्ये नारळाचा केक, वाईन केक, अंजीर केक, टुटीफ्रुटी केक, वॉलनट केक (अक्रोड), ड्रायफूट मिक्स केक, शाकाहारी लोकांसाठी अंडेविरहित केक, कॅरट केक आदी केक वसईतील ख्रिस्ती कुटुंबांमध्ये बनवले जातात. विशेष म्हणजे केवळ केकच नाही, तर विविध प्रकारची मिठाईही घरीच बनवली जाते. रवा, खसखस, साखर, नारळ यांच्या मिश्रणातून करंज्या बनवल्या जातात. उडीद, पांढरा कांदा, मिरची, हळद, मैदा, नारळ यांच्यापासून मोदक तयार केले जातात. नारळी पाक, शंकरपाळी, बिस्टिक, नानकटाई सान्ने, रोटय़ा, फुगे, इडली, कलकल, तिखट चवीचे चिकन इंदेल आदी पदार्थ बनवण्यात गृहिणी मग्न आहेत, असे राजोडी येथील नाताल रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

नाताळाच्या दिवसात नातेवाईक, मित्रमंडळी यांना घरी बोलावून फराळ देण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे इतर धर्मीयांना बोलावून सर्वधर्मसमभावाची संकल्पना दृढ केली जाते, असे रमेदी येथील फादर विकेश कोरिया यांनी सांगितले.

बाजार ‘केक’मय

बाजारातही विविध प्रकारचे केक आले असून त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. प्लम केक, ब्लॅक फॉरेस्ट , पाइनअ‍ॅपल, रेड वेलवेट झेब्रा,ब्राऊनी स्क्वेअर, कोकीज चॉकलेट अशा प्रकारचे केक उपलब्ध असून चॉकलेट, दंडी आलमेण्ट आणि प्लम केकला सर्वात जास्त मागणी आहे. लहान मुलांसाठी असलेल्या मनुका केकलाही खूप मागणी आहे. त्याशिवाय बनाना ब्रेड, कप केक्स, चॉकलेट मूस, चॉकलेट मिंट पॅन्डी, स्विस रोल्स विथ चॉकलेट, प्लम केक, न्यूरिअस, मार्श मेलो, जिजुक्स, जेली, चेरी, मर्जीपॅन, लॉलीपॉप, कुकूलस, स्मोबॉल, डेटरोल, वॉलनट पॅज, आणि मिल्क क्रीम आदी विविध पदार्थही बाजारात दाखल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:45 am

Web Title: vasai catholic making various food items at home on christmas
Next Stories
1 ‘शापूरजी पालनजी’ गृहप्रकल्पाला दंडाची नोटीस
2 बदलापूरचा तरुण कानपूरमधून बेपत्ता
3 ‘फ्लाइंग किस’ महागात पडला, तरुणाला ५ हजार रुपयांचा दंड
Just Now!
X