(मुंबईच्या आर्च बिशपपासून वेगळा होऊन १९९८ साली वसईत स्वतंत्र धर्मप्रांत स्थापन झाला. वसईसह मीरा-भाईंदरपासून पालघर जिल्ह्यातील ९ तालुके या धर्मप्रांतात (डायोसीस) समाविष्ट झाले आहेत. या धर्मप्रांताच्या अखत्यारित येणारे धर्मग्राम (पॅरिश), चर्च, धर्मगुरू आणि त्याचे सामाजिक धार्मिक कार्य सुरू असते. वसईतील प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती या धर्मप्रांताशी जोडली गेली आहे.)

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रांताशी जन्माने, कर्माने जोडलेली असते. तेथील भाषा, राहणीमान, जीवनशैली, खाद्यपदार्थ इत्यादी अनेक गोष्टी आपल्यामध्ये रुजलेल्या असतात. म्हणूनच त्या प्रांताशी आपला अभिमान जोडलेला असतो. असाच वसई प्रांतात धर्मप्रांत (डायसिस) आहे. या प्रांतात साधारण ५० धर्मग्रामे आहेत. येथील लोकसमूह हा एकाच चर्चशी, एकाच धर्मगुरूशी जोडला गेलेला आहे.

साधारण हजार कुटुंबांच्या वस्तीला धर्मग्राम म्हणजेच पॅरिश असे म्हटले जाते. एका ग्रामचे एक चर्च असते. त्या चर्चच्या धर्मगुरूंना पॅरिश प्रीस्ट असे संबोधतात. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सर्व विधी तेथेच होतात. साधारण २५ ते १०० धर्मग्रामांना एकत्रितपणे धर्मप्रांत म्हणतात. वसई धर्मप्रांतात वसई, पालघर, जव्हार, मोखाडा, भिवंडी, शहापूर, डहाणू, तलासरी, विक्रमगड असे ९ तालुके आहेत. या प्रांताची कक्षा भाईंदरच्या खाडीपासून ते नगर-हवेलीपर्यंत आहे. वसई धर्मप्रांतात सुमारे १ लाख २५ हजार (कॅथलिक) लोक राहतात. या प्रांतात साधारण ५० चर्चेस तर ११० धर्मगुरू आहेत. या सर्व चर्चचे म्हणजेच धर्मग्रामांचे तसेच धर्मगुरूंचे नेते आहेत, ज्यांना बिशप असे संबोधले जाते. जे एका धर्मप्रांताचे प्रमुख असतात. त्या धर्मप्रांतात जे-जे काही घडते त्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. तसेच प्रांताचे अधिकार ही त्यांच्याकडे असतात. पूर्वी वसई प्रांत नव्हता तेव्हा वसईतील धर्मग्रामे ही मुंबईतील आर्च बिशपच्या अधिपत्याखाली होती. काही प्रांत हे मोठे तसेच महत्त्वपूर्ण असतात म्हणून त्यांना आर्च डायसिस (धर्मप्रांत) म्हणतात, तर त्यांच्या प्रमुखाला आर्च बिशप असे संबोधले जाते. वसई हा आर्च प्रांत नाही. तरी देखील, येथील बिशप डॉ. फेलिक्स मचाडो यांना त्यांच्या कामगिरीमुळे ‘आर्च’ बिशप ही उपाधी देण्यात आलेली आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीवर संशोधन करून पीएचडी प्राप्त केलेली आहे. ते व्हॅटिकनला द डिकॅस्ट्री ऑफ इंटरव्हिजस डायलॉग या खात्यात काम करत होते. त्यावेळी त्यांनी सर्व धर्म एकत्र कसे राहतील यावर काम केले होते. विविध धर्मावर त्यांनी अभ्यास केलेला आहे.

बिशप हे सर्व ग्रामांचे सूत्रधार असतात. ते सर्व चर्चच्या कामांवर देखरेख ठेवतात. लोकांच्या सेवेत कोणत्या प्रकारची कमतरता नाही ना याची पडताळणी करतात. काम व्यवस्थित होत नसल्यास धर्मगुरूंना योग्य ते मार्गदर्शन देतात. धर्मगुरूंच्या सभांचे ते अध्यक्ष असतात. तसेच ते दृढीकरण संस्कार (साक्रामेंत) देण्यासाठी प्रत्येक चर्चमध्ये जातात. चर्चमध्ये धर्मगुरूंची नेमणूक करतात, त्यांच्या बदल्या करतात, प्रमुख आणि साहाय्यक धर्मगुरूंची नेमणूक करतात, जून-जुलै महिन्यामध्ये चर्चमध्ये येणाऱ्या नव्या धर्मगुरूंचा पदग्रहण विधी करतात. यावेळी ते संपूर्ण चर्चचा कारभार त्यांच्यावर सोपवतात. प्रांतातील सोहळ्यांचे, परिसंवादाचे नियोजन करतात. वसईत दरवर्षी नाताळमध्ये बिशप ‘सर्व धर्मीय सुसंवाद’ परिसंवादाचे आयोजन करतात. प्रांतातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, आनाथालये, वृद्धाश्रमे, मद्यमुक्ती संस्था, विशेष मुलांच्या शाळा इत्यादी सर्व सार्वजनिक संस्थांना बिशप मार्गदर्शन करत असतात. कुटुंबीय तंटे, धर्म किंवा जातीतील लोकांमधील तंटे इत्यादी गंभीर तंटे सोडवून समाजात शांती प्रस्थापित करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अणखी अशी अनेक कामे बिशप करत असतात. बिशपांच्या कार्यालयात विकर जनरल हे पद असते जे बिशपांची सावली म्हणून कार्य करते. बिशपांच्या अनुपस्थितीत ते त्यांची सर्व कार्ये करतात आणि निर्णयही घेतात.

धर्मप्रांत पाळकीय परिषद आणि धर्मगुरू परिषद अशी दोन अंगे बिशपांसह कार्यरत असतात. धर्मप्रांत पाळकीय परिषदे अंतर्गत धर्मग्राम पाळकीय परिषद असते ज्यामध्ये  एका ग्रामातील २० जण हे त्या चर्चचे सदस्य असतात. ते त्यांच्या विभागातील समस्या, प्रकल्प घेऊन येतात. त्यांवर चर्चा करून तोडगा काढतात. त्यापैकी एक जण हा धर्मप्रांत पाळकीय परिषदेचा सदस्य असतो. तो दर महिन्याला इतर ग्रामातील सदस्यांसह सभेला जातो आणि तेथे त्या-त्या विषयांवर चर्चा केली जाते. तो सदस्य बिशपांना एखाद्या विषयावर मार्गदर्शन करतो. ही दोन्ही अंगे एखाद्या गोष्टीवर मिळून तोडगा काढतात. जसे की, नवे चर्च बनवायचे का? जमीन विकायची का? नवी जमीन खरेदी करण्याबाबत इत्यादी विषयांवर ते काम करत असतात.

धर्मगुरूंमधून एकाची निवड बिशप म्हणून करतात. त्यास व्हॅटिकनने तसेच दिल्लीतील राजदूताने संमती दर्शविली की पाच-पंचवीस बिशप तेथे त्या नव्या बिशपांना कथेड्रा नामक धर्मपीठावर विधीपूर्वक बसविण्यासाठी जातात. ज्या चर्चमध्ये हे धर्मपीठ असते तेथे बिशप बसून त्यांची सर्व कामे करतात. तेथूनच प्रांताची सर्व सूत्रे चालवली जातात. त्या चर्चला मदर चर्च असे म्हणतात. वसईमध्ये पापडी येथे हे लेडी ऑफ ग्रेट कथ्रेडल (धर्मपीठ) आहे.

वसईचे बिशप हे बाभोळ्याजवळ बऱ्हामपूर येथे बिशप्स हाऊस येथे राहतात. सर्व मुख्य सभा या बिशप्स हाऊसमध्ये होतात. हे हाऊस १९९८ मध्ये वसई धर्मप्रांत बनल्यावर बांधण्यात आले. येथील पहिले बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी तुकारामांवर पीएचडी मिळवली होती. या प्रांतात बिशपांची शिकवण सांगणारी ‘सुवार्ता’ (मराठी भाषेतून गेली ६४ वर्षे निघत आहे) आणि शांतिदूत (गेली ५ वर्षे इंग्रजी भाषेतून) ही दोन मुखपत्रे निघतात. यामध्ये बिशपांचे निर्णय सांगितले जातात.

१० धर्मग्रामांच्या संचाला डिनरी असे संबोधले जाते. वसईत नंदाखाल, सांडोर, पापडी, तलासरी, निर्मळ अशी पाच डिनरी आहेत. या डिनरींच्या प्रमुखाला डीन असे म्हणतात. साहाय्यक धर्मगुरू, पॅरिश प्रीस्ट (धर्मगुरू), डीन आणि बिशप या पद्धतीने संपूर्ण प्रांताची कार्ये विभागलेली आहेत.

दिशा खातू disha.dk4@gmail.com