सामूहिक प्रार्थना, प्रबोधन सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

समाजातील तळागाळातील घटकांचा विचार करण्याची प्रेरणा देणारा नाताळ सण वसईत उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. नाताळच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री वसई धर्मप्रांतात समावेश असलेल्या ५२ चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर वसईकरांनी एकमेकांच्या घरी भेटी देत नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त शहरात विविध ठिकाणी सामूहिक प्रार्थना, सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच नाताळच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती. त्या दृष्टीने चर्चमधून वातावरणनिर्मितीही करण्यात आली होती. नायगावजवळील पालीपासून वसई-विरारसह मोखाडा, डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, भिवंडी, विक्रमगडपर्यंत पसरलेल्या वसई धर्मप्रांतातील एकूण ५२ चर्चमध्ये गुरुवारी मध्यरात्री नाताळचा विशेष प्रार्थनाविधी पार पडला. या वेळी चर्चना रोषणाई करण्यात आली होती.

आकर्षण असलेल्या गोठय़ांमधून युवामंडळींची सर्जनशीलता दिसून आली. चर्चच्या परिसरात, घराचे अंगण तसेच सार्वजनिक ठिकाणी येशूच्या जन्माचे देखावे उभारण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धन, स्त्री भ्रूणहत्या, कौटुंबिक सुसंवाद, युवकांमधील वाढती व्यसनाधीनता अशा विविध विषयांवर या गोठय़ांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आल्याचे दृश्य वसईत दृष्टीस पडत आहे. त्याशिवाय प्रत्येकाने आपल्या घरासमोर आकर्षक कंदील आणि ख्रिसमस ट्री उभा केला आहे. वसईच्या अनेक घरांमध्ये गृहिणींनी केकबरोबर खास वसईचे पारंपरिक पदार्थ तयार केले होते. एकमेकांच्या घरी भेटी देणे, धार्मिक प्रवचने आणि कार्यक्रमात भाग घेऊन लोकांनी नाताळ साजरा केला. दरम्यान, नाताळच्या आठवडय़ात वसईच्या विविध भागांत सामूहिक प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाणार आहे.

नाताळ मिरवणुकीतून शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाशझोत

वसईच्या रमेदी भागातील घोगाले, नारगुडी आणि शांतिवन या गावांतील रहिवाशांनी एकत्र येऊन २५ डिसेंबरला संध्याकाळी नाताळ मिरवणुकीचे आयोजन केले होते. ही मिरवणूक घोगाले गावातून गायवडीमार्गे होळी, आक्टणमार्गे बंगली, दिवानवाडीमार्गे पापडी नाका, तेथून मुख्य रस्ता आणि पुन्हा रमेदी घोगाळे गावात गेली. या वेळी येशूजन्माच्या देखाव्यासोबत देशातील विविध संस्कृती आणि वेशभूषांवर आधारित देखाव्यांचेही प्रदर्शन झाले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसह विविध कष्टकरी वर्गाच्या समस्यांवरही या कार्निवलच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला. ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.

आर्चबिशपांचा नाताळ दुर्गम भागात

वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी शहापूर येथील आसनगावातील अतिदुर्गम भागातील आदिवासींसोबत नाताळ साजरा केला. मंगळवारचा संपूर्ण दिवस त्यांनी आदिवासींच्या सहवासात व्यतीत केला. याशिवाय तिथल्या एड्सग्रस्त बालकांबरोबरही त्यांनी नाताळचा आनंद साजरा केला.

नंदाखाल येथे कुपारी महोत्सव 

वसईतील सामवेदी बोलीभाषा आणि संस्कृतीला उजाळा देण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळाने २६ डिसेंबर रोजी नंदाखाल येथे संध्याकाळी ४.३० वाजता कुपारी संस्कृती दिंडीने या महोत्सवाला सुरुवात होईल. यामध्ये कुपारी संस्कृतीचे अनोखे दर्शन पाहावयास मिळणार आहे.