पोलीस अधीक्षकांकडून गृहखात्याकडे प्रस्ताव

वसईतील सागरी किनारपट्टीचा भाग लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने वसईत तीन नवीन सागरी पोलीस ठाणी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी गृहखात्याकडे पाठवला आहे. यामुळे वसईतील पोलीस दलात वाढ होण्यासही मदत होणार आहे.

वसई-विरार शहरात सध्या सात पोलीस ठाणी आहेत. वसईच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग हा सागराने वेढलेला आहे. सागरी किनारपट्टी ही नेहमीच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा सागरी मार्गाने झाला होता. १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी बंदरातून स्फोटके आणली गेली होती. तेव्हापासून सागरी सुरक्षा महत्त्वाची मानली जातात.

संपूर्ण पालघर जिल्ह्य़ात २३ पोलीस ठाणी असून त्यापैकी १० पोलीस ठाणी ही सागरी आहेत. त्यात वसईतील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. त्यामुळे वसईची सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी तीन नवीन सागरी पोलीस ठाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी सागरी पोलीस ठाणी नायगाव, बोळींज आणि वैतरणा या  परिसरात उभारण्यात येणार आहेत.

पदे रिक्त

वसई-विरार शहरातील सात पोलीस ठाण्यात पोलीस बळ कमी आहे. सात पोलीस ठाण्यांना मिळून २०० हून अधिक मंजूर पदे रिक्त आहे. तसेच दोन हजार लोकसंख्येमागे अवघा एक पोलीस असे सध्याचे प्रमाण आहे. नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती झाल्यास पोलीस बळ वाढेल, तसेच साधनसामग्रीत वाढ होणार आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी मीरा-भाईंदर आणि वसई-विरार आदींना मिळून स्वत्रंत सागरी आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

सागरी पोलीस ठाण्यांचे काम इतर पोलीस ठाण्यांपेक्षा वेगळे असते. कारण सागराशी संबंधित बंदोबस्त, गुन्हे हे वेगळ्या प्रकारचे असतात. केंद्र सरकारचेही त्यावर नियंत्रण असते. आपली किनारपट्टी अधिकाअधिक सुरक्षित आणि भक्कम करण्याचा हा प्रयत्न आहे.

शारदा राऊत, पोलीस अधीक्षक