News Flash

श्वान निर्बिजीकरण केंद्र गोत्यात

केंद्रीय पशूकल्याण मंडळाने या केंद्राला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

वसईतील श्वान निर्बीजीकरण केंद्रात श्वानांचे हाल होत आहेत.

श्वानांना क्रूर वागणूक देत असल्याने गुन्हा दाखल; केंद्रीय पशूकल्याण मंडळाची ‘कारणे दाखवा’

शहरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने शहरात श्वान निर्बीजीकरण केंद्र सुरू केले, मात्र या केंद्रात श्वानांना क्रूर वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. निर्बीजीकरण करताना या केंद्रात एका श्वानाचा मृत्यू झाल्याने माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर केंद्रीय पशूकल्याण मंडळाने या केंद्राला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

वसईच्या नवघर महापालिकेचे श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. ठाणे येथील अ‍ॅनिमल फ्रेंड्स वेल्फेअर पब्लिक सोसायटी या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे केंद्र सुरू असून दररोज १० ते १५ श्वानांचे निर्बीजीकरण या केंद्रात केले जाते. मात्र या केंद्रात निर्बीजीकरणासाठी आणि उपचारासाठी आलेल्या श्वानांची योग्य देखभाल होत नाही आणि त्यांना क्रूरतेने हाताळले जाते, असा आरोप पूर्वीपासून प्राणिमित्र संघटना करत होत्या. जुलै महिन्यात रस्त्यावर एक श्वान अत्यवस्थ अवस्थेत प्राणिमित्राला आढळून आले होते. या श्वानावर या केंद्रात निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झालेली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्याला बाहेर सोडण्यात आल्याने पोटाचे टाके फुटून त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत वसईतील प्राणिमित्र नंदा महाडिक यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. परळच्या पशू रुग्णालयात या श्वानाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रिया केल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे माणिकपूर पोलिसांनी याबाबत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्यावर वन्यजीव पशू कायदयाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नंदा महाडीक आणि सलीम चरणीया या दोन प्राणिमित्रांनी याबाबत केंद्र सरकारच्या पशू कल्याण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महापालिका आणि या श्वान निर्बीजीकरण केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

१५ दिवसात केंद्राने आणि पालिकेने याबाबतचा खुलासा करणे आवश्यक आहे. तो न केल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्यास या संस्थेचा श्वान निर्बीजीकरण परवाना रद्द होऊ  शकतो. या केंद्राचा परवाना रद्द झाल्यास पालिकेकडे तात्काळ दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

शस्त्रक्रियेनंतर श्वानांना किमान आठ दिवस उपचारासाठी केंद्रात ठेवणे बंधनकारक असते. परंतु या केंद्रात शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच श्वानांना सोडण्यात येते. याशिवाय श्वानांना निकृष्ट आणि अपुरा आहार दिला जातो. तेथे श्वानांच्या आरोग्याला पोषक वातावरण नसते.

–  नंदा महाडिक, प्राणिमित्र.

हे आरोप सूडबुद्धीने केले आहेत. याबाबत योग्य तो खुलासा केंद्रीय मंडळाला पाठवला जाईल.

– डॉ. जगदीश पाटील, संचालक, श्वान निर्बीजीकरण केंद्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:43 am

Web Title: vasai corporations dog house
Next Stories
1 शहरबात : एसटी हरवतेय..
2 घरांच्या मंदीत सवलतींची संधी!
3 निवडणुकीच्या तोंडावर बक्षिसांची लूट
Just Now!
X