News Flash

जनसुनावणीसाठी रणनीती

एमएमआरडीएच्या प्रस्तावित २० वर्षांच्या विकास आराखडय़ाविरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे.

वसई पर्यावरण समितीचा निर्धार; प्रसंगी न्यायालयात जाणार

एमएमआरडीए आराखडय़ाविरोधातील हरकतींवर सुनावणी घेण्याचा प्रयत्न वसई पर्यावरण संवर्धक समितीसह अन्य संघटनांच्या रेटय़ामुळे हाणून पडला आहे. आता हरकती घेणाऱ्या प्रत्येक नागरिकास वैयक्तिक पत्र पाठवून गावातच सुनावणी घेण्यासाठी समिती प्रयत्नशील असून या सुनावणीसाठी खास रणनीती तयार केली आहे. वेळप्रसंगी याविरोधात न्यायालयात जाण्याचीही तयारी समितीने केली आहे.

एमएमआरडीएच्या प्रस्तावित २० वर्षांच्या विकास आराखडय़ाविरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. वसई-विरारमधून हजारो हरकती दाखल झाल्या आहेत. त्यावर गुरुवारी नालासोपारा येथे सुनावणी घेण्याचा प्रयत्न झाला. वसई पर्यावरण संवर्धक समितीने सुरुवातीपासून वैयक्तिक सुनावणीचा आग्रह धरला होता. गुरुवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या सुनावणीला समितीने विरोध केला आणि ही सुनावणी तहकूब करण्यात आली. वरिष्ठांशी चर्चा करून सुनावणीबाबत निर्णय कळवला जाईल, असे एमएमआरडीएने समितीला लेखी आश्वासन दिले आहे.

आता प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक पत्र पाठवून सुनावणी घ्यावी लागेल, असे समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी सांगितले. जर वैयक्तिक सुनावणी झाली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ , पण वैयक्तिक सुनावणी घेऊन या आराखडय़ातील जाचक अटी रद्द करू, असा निर्धार वर्तक यांनी व्यक्त केला.

रणनीती काय?

सुनावणीसाठी काय मुद्दे घ्यायचे आणि कशी हरकत नोंदवायची यासाठी समितीने खास मुद्दे तयार केले असून नागरिकांना ते जागोजागी बैठका घेऊन समजावून सांगण्यात येत आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही मार्गदर्शन केले आहे. एमएमआरडीएला वसईतील गावात येऊन सुनावणी घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही समितीने दर्शवली आहे.

तर घातक आराखडा माथी

सुनावणी घेऊन आराखडा जनतेच्या माथी मारण्याचा एमएमआरडीएचा हा प्रयत्न होता. या सुनावणीला विरोध होता. परंतु गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी निर्भय जनमंचने सुनावणी देण्यास सुरुवात केल्याबद्दल पर्यावरण संवर्धक समितीने टीका केली आहे. अशा प्रकारे त्यांना सुनावणी दिली तर त्यांची योजना यशस्वी होईल आणि जनतेला हा घातक आराखडा सहन करावा लागेल, असे समितीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:00 am

Web Title: vasai development plan vasai environment committee
Next Stories
1 वसईतील सर्व मोबाइल मनोरे बेकायदा
2 खाऊखुशाल : इटालियन-मेक्सिकन स्वाद
3 ‘तातडीच्या कामां’वरून शिवसेनेला घरचा आहेर
Just Now!
X