पश्चिम रेल्वेकडून वेळापत्रकाचे काम सुरू

वसई : वसईतून दररोज सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी सुटणारी महिला विशेष लोकल रद्द केल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. यामुळे आता रेल्वेने ही लोकल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या लोकलचे वेळापत्रक मात्र बदलणार असून त्याबाबतचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकातून दररोज सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांनी महिला विशेष लोकल ट्रेन सुटत होती. या लोकलचा फायदा वसईसह नायगाव, भाईंदर, मीरा रोडच्या महिला प्रवाशांना होत होता. मात्र पश्चिम रेल्वेने अचानाक १ नोव्हेंबरपासून ही लोकल रद्द करून ती वसईऐवजी विरार येथून सोडण्यास सुरुवात केली होती. त्याचा हजारो महिला प्रवाशांना फटका बसला. वसई, नायगाव, भाईंदर, मीरा रोड येथील महिलांना लोकलमध्ये चढण्यास व उतरण्यास मिळत नसल्याने गैरसोय होऊ  लागली होती, तसेच वयोवृद्ध महिला, गर्भवती महिला, रुग्ण यांनाही लोकल जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे मोठा जनक्षोभ निर्माण झाला होता.

ही लोकल पुन्हा सुरू करावी यासाठी विविध संघटना आणि पक्षांनी आंदोलने केली होती. तसेच सह्य़ांच्या मोहिमा घेण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या महापौरांनीही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन ही लोकल पूर्ववत वसईतून सुरू करण्याची मागणी केली होती.

पुन्हा वसईला लोकल सुरू केली तर विरारच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे विरारमधून सुटणारी महिला विशेष लोकल कायम ठेवावी आणि वसईतून पुन्हा महिला स्पेशल लोकल सुरू करावी याचा पश्चिम रेल्वे विचार करत आहे. मात्र ती ९ वाजून ५६ मिनिटांनी न सुटता अन्य वेळेत सोडली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महिला विशेष लोकलच्या वेळापत्रकाचे काम सुरू आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जसे वेळापत्रक तयार होईल, त्यानुसार हा निर्णय घेतला जाईल.

– रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे