पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा; आजपासून गावागावांत जनजागृती

वसई-विरार शहरातून एसटी सेवा बंद करण्याच्या निर्णयाचे वसईत तीव्र पडसाद उमटले असून याविरोधात जनजागृती करून आंदोलन करण्याचा निर्णय जनआंदोलन समितीने घेतला आहे. त्यासाठी बुधवारपासून गावोगावी बैठका घेण्यात येणार आहेत.

वसईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली एसटी सेवा बंद होणार असल्याने त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका प्रलंबित होती. त्यातील एका निकालाचा आधार घेत एसटी महामंडळाने वसईच्या शहरी भागातील सेवा सोमवारपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात वसईतील जनमत पेटू लागले असून हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एसटी सेवा सुरू ठेवावी

एसटी वाचवण्यासाठी अनेक वर्षे लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. वसईतील एसटी लोकांच्या भावभावनांशी निगडित आहे. एसटी जनतेच्या सुविधेसाठी आहे, नफ्यासाठी नाही. खासगी ठेकेदार नफ्यासाठी बस चालवणार असल्याने त्यात सर्वसामान्य प्रवासी भरडला जाणार आहे. एसटी बंद झाल्याने जनतेची गैरसोय होईल. त्यामुळे ही सेवा सुरू ठेवावी, असे ते म्हणाले.

आजपासून गावागावांत जनजागृती

एसटी वाचवण्यासाठी न्यायालयात गेलेल्या जनआंदोलन समितीला या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. यासाठी आता निर्णायक लढा उभारण्याची तयारी जनआंदोलन समितीने केली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिली. यासाठी बुधवारपासून गावागावांत जनजागृती सभा घेतली जाणार आहे. एसटी वाचविण्यासाठी पुढील आंदोलनची दिशा काय असेल ते ठरवण्यासाठी बुधवारी मर्सेस गावात पहिली बैठक आयोजित केली जाणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

सर्वसामान्यांची नाराजी

हा निर्णय संतापजनक आहे. गेली अनेक वर्षे एसटी वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. जनतेच्या भावनेची कदर का केली जात नाही? वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर याप्रकरणी गप्प का आहेत?

– सायमन मार्टिन, सामाजिक कार्यकर्ते

पालिकेची परिवहन सेवा म्हणजे धूर ओकणारा पिवळा डबा आहे. दिवसभर त्याच्या प्रदूषणाची भर वसईकरांना सोसावी लागणार आहे. परिवहनचा मनमानीपणा नागरिकांना सहन करावा लागेल.

–  चार्ली रोझारियो, रहिवासी