वसईमध्ये सध्या पोलिसांचे पोलिसांविरोधातील बंड खूपच गाजत आहे. एकामागून एक विविध ठिकाणी तीन पोलिसांनी बंड केले आहे. हे बंड वैयक्तिक कारणापोटी नसून सामाजिक आणि पोलीस दलाच्या हितासाठी करण्यात आले असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. हा प्रश्न केवळ बंडाचा नसून या पोलिसांनी उपस्थित केलेले प्रश्न, व्यवस्थेतील दाखवून दिलेल्या त्रुटी आणि मांडलेले भीषण वास्तव यांचा आहे.

वसईतील पोलीस दलात सध्या खळबळ माजली आहे. कधी नव्हे तीन पोलिसांनी खात्याविरोधातच जाहीरपणे बंड केले आहे.  एकामागून एक विविध ठिकाणी तीन पोलिसांनी बंड केले आहे. हे बंड वैयक्तिक कारणापोटी नसून सामाजिक आणि पोलीस दलाच्या हितासाठी करण्यात आले असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. हा प्रश्न केवळ बंडाचा नसून या पोलिसांनी उपस्थित केलेले प्रश्न, व्यवस्थेतील दाखवून दिलेल्या त्रुटी आणि मांडलेले भीषण वास्तव यांचा आहे. शहरात गुन्हेगारी कशी वाढली आहे. कुंपणच शेत खात आहे तसेच अन्यायाविरोधात पोलिसांना काम करून दिले जात नाही म्हणून हे बंड करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत केवळ चौकशीचा फार्स दाखविण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक पोलीस शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली आहे. शहरात चालणाऱ्या अनैतिक धंद्यांविरोधात वरिष्ठ कारवाई देत नाहीत अशी तक्रारच त्यांनी केली आहे. ही वैयक्तिक तक्रार असती तर ते समजू शकले असते. परंतु त्या पत्रातच त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हे पत्र लिहीत असल्याचे नमूद केले आहे. या पत्रात त्यांनी शहरात कशा प्रकारे अमली पदार्थाचे रॅकेट सुरू आहे. अमली पदार्थाची पाळेमुळे कशी खोलवर रुजली आहेत आणि त्यामुळे खुद्द पोलिसांचे कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले आहे त्याचा उल्लेख केला आहे. तरुण आणि अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात कसे लावले जाते तेदेखील सांगितले होते. हे सर्व अनैतिक धंदे सुरू असताना त्याची माहिती देऊनही वरिष्ठ कारवाई करत नाहीत आणि मलादेखील कारवाई करून देत नाहीत, असा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी विभागीय पोलीस उपअधीक्षकामार्फत करण्यात आली आहे. गोसावी यांच्या बंडाने चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण त्यांच्या पत्राने शहरातील अमली पदार्थ आणि अनैतिक धंदे चव्हाटय़ावर आले आहेत. गोसावी यांच्या बंडाला लोकसत्ताने वाचा फोडली होती. समाजमाध्यमातून गोसावी यांना मोठा पाठिंबा मिळाला. पोलीस खात्यातील अनागोंदीपणा, अनास्था आणि निष्क्रियता त्यांनी चव्हाटय़ावर आणली होती. हा प्रकार उघडकीस आणला म्हणून कारवाई होण्याची शक्यता त्यांनी गृहीत धरली होती आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणाचे पुरावे असून वेळ आल्यास सगळ्यांना उघडे पाडणार असल्याचे बेधडक त्यांनी पत्रात जाहीर केले होते. त्यामुळे तूर्तास गोसावी यांना अभय मिळाले आहे. वसईकर जनता, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी गोसावी यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचा आवाज मुख्यमंत्र्ययांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

दुसरे बंड वसई पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत वायदंडे यांनी केले आहे. एका अर्भकाच्या मृत्यूचा तपास वायदंडे यांच्याकडे होता. हा तपास करत असताना रुग्णालयात जन्मलेल्या अर्भकाला दगड बांधून पाण्यात टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वायदंडे यांनी पुराव्यांच्या आधारे हत्येचे भारतीय दंडविधान संहितेचे कलम ३०२ दाखल केले. मात्र वसई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी हे कलम काढून अर्भकाला फेकल्याचे ३१८ हे कलम दाखल केले. एवढय़ावरच न थांबता वायदंडे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आणि त्यांची तात्काळ उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यालयीन कामे करण्यासाठी बदली करण्यात आली. या विरोधात वायदंडे यांनी आवाज उठवून वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. कुणा आरोपीला वाचविण्यासाठी हत्येच्या गंभीर गुन्ह्य़ाचे कलम काढून टाकल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आजही या प्रकरणाचे पुरावे असल्याचे दावा वायदंडे करत आहेत. जर हत्येचा गुन्हा खोटा असेल तर न्यायालयात टिकणार नाही. मग कमी गंभीरतेचे कलम का दाखल केले, असा सवाल त्यांनी केला. आपल्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठाविरोधात आवाज उठविण्याचे हे प्रकरण पोलीस दलात गंभीर मानले जात आहे.

वसई पोलीस ठाण्याची जमीन हडप करण्याचे एक प्रकरण लोकसत्ताने बाहेर काढले होते. या पोलीस ठाण्याचे पोलीस शिपायाने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्या शिपायाने नोकरीत राहून पत्नीच्या माध्यमातून सरकारदरबारी पाठपुरावा केला आणि हा प्रयत्न हाणून पाडला. पोलीस ठाण्याच्या जागेचा कसा बनावट नकाशा बनवला ते कांबळे यांनी समोर आणले होते. एवढंच नव्हे तर विविध सरकारी कार्यालयात जाऊन पाठपुरावा करत होते. कांबळे यांच्या मागे तक्रारी आणि चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात आला आहे. पोलीस वसाहतीतील समस्या, पोलिसांची जागा हडप करण्याचे प्रयत्न आदी मुद्दय़ांवरून पोलीस पत्नींनी २६ जानेवारीपासून उपोषणाचे हत्यारही उपसले होते. खासदार चिंतामण वनगा यांनी आता या पोलिसांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

एवढय़ा सगळ्या वादळी घडामोडी घडत असताना वरिष्ठांनी थेट कारवाई करणे आवश्यक होते. मात्र चौकशी समितीच केवळ नेमण्यात आली आहे. महेश गोसावी यांनी पत्र दिल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध करताच दुसऱ्या दिवशी नालासोपाऱ्याच्या लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर धाडी घालण्यात आल्या. पण तेदेखील तेवढय़ापुरतंच. सखोल आणि धडक कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. अमली पदार्थाचे जाळे शहरात रुजले आहेत. ते खणून काढण्याचे एकत्रित प्रयत्न होताना दिसत नाही. पोलिसांच्या बंडाची आग धगधगतेय. ते वरिष्ठ पातळीवरून शांत केले जाईल, पण त्यांनी मांडलेले वास्तव भयानक आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक हा पोलीस ठाण्यातील दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी असतो. त्याने लावलेले हत्येचे कलम का काढले जाते, कुणाला वाचविण्यासाठी, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांत मोठय़ा प्रमाणावर नाराजी असून पोलीस दलाचे खच्चीकरण होत आहे. यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास मोठे बंड होण्याची शक्यता आहे. कदाचित ते अधिक घातक ठरू शकणार आहे.

खाबुगिरिचे दरपत्रक

काही महिन्यांपूर्वी रेती व्यावसायिकांनी पोलिसांच्या खाबूगिरीचे दरपत्रकच जाहीर केले होते. तसेच विविध लॉज आणि बार मालकांकडून कसे आणि किती हप्ते गोळा केले जातात त्याची तपशीलवार तक्रारच करण्यात आली होती. या प्रकरणानंतर काहीच कारवाई झाली नव्हती. शहरातील दररोज घडणाऱ्या गुन्ह्य़ांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. पालघर जिल्ह्य़ात २३ पोलीस ठाणी आहेत. पोलीस अधीक्षिका शारदा राऊत या पोलीस कल्याणासाठी काम करत आहेत. पोलिसांना चांगले काम करता यावे यासाठी त्या विविध योजना राबवण्यात प्रयत्नशील आहेत. परंतु त्यांच्या पोलीस खात्यातील ही बंडखोरी त्यांनी गंभीरतेने घेण्याची गरज आहे. पोलीस खात्यात सहसा आवाज उठविला जात नाही. त्यामुळे ही बंडखोरी महत्त्वाची ठरते. मुळात पोलिसांकडे तक्रारी का कराव्या लागतात, त्यांना स्वत:हून कारवाई करता येत नाहीत का, हादेखील एक वेगळा मुद्दा आहे. वसईतील अनेकांनी तो उपस्थित केला आहे.

पदावन्नीती आणि दुय्यम वागणूक

गेल्या काही दिवसांतल्या या पोलीस बंडांच्या घटनांनी पोलीस दल ढवळून निघाले आहे. या तीन पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आवाज उठविला पण अंतर्गत धुसफूस मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. एकमेकांविरोधात वरिष्ठांचे कान फुंकले जात असल्याने पोलीस नाराज आहेत. अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याच अंतर्गत कलहामुळे निर्माण झालेल्या राजकाराणातून वालीवच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची त्याच पोलीस ठाण्यात पदावन्नीत करण्यात आली आहे. ज्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करायचे त्याच पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून काम करावे लागणे ही नामुष्की असते.