वसई रेल्वे स्थानकात घडणारे गुन्ह्यंचे प्रकार व इतर घटना यामध्ये पकडल्या जाणाऱ्या आरोपींना  ठेवण्यासाठी वसई रेल्वे स्थानकात पोलीस कोठडीची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होऊ  लागली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वसई रेल्वे स्थानकातून मोठय़ा प्रमाणात प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे या भागात घडणाऱ्या काही घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान काम करीत असतात. प्रवाशांची हुल्लडबाजी, अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारे प्रवासी, हाणामारी, वादविवाद, विनातिकीट प्रवास, सोनसाखळी चोरी अशा विविध घटना होत असतात. यामध्ये जे आरोपी आढळून येतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस चौकीत आणले जाते. परंतु पकडून आणलेले आरोपी ठेवण्यासाठी पोलीस कोठडी असणे गरजेचे आहे. मात्र ती सुविधा वसई आणि भाईंदर रेल्वे स्थानकात उपलब्ध नाही.

वसई रेल्वे स्थानकात पोलीस कोठडी तयार करण्यात यावी, यासाठी मागणी करण्यात आली आहे. कोठडी नसल्याने पकडून ठेवण्यात आलेल्या मुजोर प्रवाशांना ठेवणार कुठे, असा प्रश्न निर्माण होत असतो यासाठी या ठिकाणी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे.

– संतोष यादव, रेल्वे सुरक्षा बल अधिकारी