भूगर्भातील पाण्याची पातळी घटल्याने क्षारांच्या प्रमाणात वाढ
अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने आणि अतिरिक्त पाणी उपशामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली असून त्याचा परिमाण वसई-विरार भागातील पाण्यावर झाला आहे. पाण्याची पातळी घटल्याने क्षारांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वसईकरांच्या घरी चक्क खारे पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनियमित पाणीपुरवठा, पाणीटंचाई आणि खारट पाणी यामुळे ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ अशी अवस्था सध्या वसई-विरारमधील रहिवाशांची झाली आहे. तालुक्यातील पश्चिमपट्टा हा हरित पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आढळतो.
याचाच फायदा घेत काही ग्रामस्थांनी विहिरी व छोटय़ा-मोठय़ा तलावांतून पाणीउपसा करून बाटलीबंद पाणीविक्रीचा व्यावसाय सुरू केला आहे. पाणी शुद्धीकरणाच्या नावाने दररोज हजारो लिटर पाणी उपसा केला जातो. या पाणी उपशाचा दुष्परिणाम परिसरातील विहिरींवर दिसू लागला आहे. या परिसरातील विहिरींमध्ये पाण्याची पातळी खालावून त्यातील क्षारांचे प्रमाण वाढले आहे. रहिवाशांच्या घरी क्षारयुक्त खारे पाणी येत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. वसई तालुक्याला सूर्या, पेल्हार आणि उसगाव या धरणांतून पाणीपुरवठा होतो. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दररोज १३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. सध्या तालुक्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दररोजच्या वापरासाठी विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा उपायच राहत नाही.

शेतीचे नुकसान
वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. बागायती शेतीमध्ये पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा दिला तर पिकांची वाढ चांगली होते. वसई तालुक्यातील वसई गाव, निर्मळ, अर्नाळा, कळंब परिसरात बागायतदार भरपूर प्रमाणात आहेत. जर खारट पाणी शेतीस दिल्यास शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.