News Flash

सदोष वीजमीटरचा फटका

शहरात ४५ हजारांहून अधिक वीजमीटर सदोष असल्याचे उघड झाले आहे.

सदोष वीजमीटरचा फटका
महावितरणच्या कार्यालयात ग्राहकांची गर्दी

वसईकरांच्या माथी अवाजवी वीजदेयक; महावितरणच्या कार्यालयात ग्राहकांची गर्दी

वसई : महावितरणच्या सदोष वीज मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना अवाजवी वीजदेयके येत असून जाब विचारण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात गर्दी केली आहे. नवीन वीजमीटर लावण्याचे आश्वासन २०१६मध्ये देऊनही अद्याप सदोष वीजमीटर बदलण्यात आलेले नाहीत. आजही शहरात ४५ हजारांहून अधिक वीजमीटर सदोष असल्याचे उघड झाले आहे.

महावितरणाचे शहरात वसई आणि नालासोपारा असे एकूण दोन उपविभाग आहेत. वसई विभागात वसई गाव, वसई शहर पूर्व आणि पश्चिम तसेच वाडा यांचा समावेश आहे, तर नालासोपारा उपविभागात विरार, नालासोपारा पूर्व, नालासोपारा पश्चिम आणि आचोळे यांचा समावेश आहे. नालासोपारा विभागात सव्वापाच लाख ग्राहक आहेत, तर वसई विभागात २ लाख ४० हजार ग्राहक आहेत. मात्र सध्या वीजग्राहकांना अवाच्या सवा वीज देयके येण्याचे सत्र सुरूच आहे. अवाजवी देयके पाहून ग्राहक हवालदिल होत असून ती कमी करण्यासाठी त्यांना महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. यासाठी त्यांना कामाचा खाडा करावा लागत आहे. वीज देयके विभागीय कार्यालयातून कमी होत नसल्याने वीजग्राहकांना महावितरणाच्या वसई पूर्वेच्या मुख्यालयात रांगा लावाव्या लागत आहेत.

४५ हजार वीजमीटर सदोष

वसई विभागात १४ हजार ६२८ तर विरार विभागात ४२ हजार ३०६ असे मिळून एकूण ५६ हजार ९३४ घरगुती वापराची वीजमीटर सदोष होती. औद्योगिक वापराची ४२७ वीज मीटर सदोष आहेत. ही माहिती खुद्द महावितरणाने प्रसिद्ध केली. मार्च २०१८ पर्यंत हे मीटर बदलणे आवश्यक होते, परंतु ते बदलण्यात आलेले नाहीत. महावितरणाने मात्र दोन महिन्यांत ८  हजार ७४१ सदोष मीटर आणि ८ हजार ३९२ चक्री मीटर असे मिळून एकूण सुमारे १७ हजार वीज मीटर बदलल्याचे महावितरणाचे अधीक्षक अभियंता अरुण पापडकर यांनी सांगितले. आम्ही शहरातील वीज मीटर बदलत असून केवळ ४५ हजार सदोष वीज मीटर बदलणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन मीटर नाहीत!

महावितरणाकडे नवीन वीज मीटरचा तुटवडा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे वीज मीटर बदलून देता येत नाही. यामुळे अवाजवी देयकांचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. कारण नसताना महावितरणाने २०१३-१४ या वर्षांत शहरातील ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलली होती. फ्लॅश कंपनीची तब्बल ४ लाख वीज मीटर बसवण्यात आली होती. विशेष म्हणजे कुठलीही मागणी नसताना ही नवीन मीटर बसवण्यात आली होती. ही सर्व मीटर सदोष असल्याने वाढीव वीज बिले येऊ  लागली. सदोष वीज मीटरचा मुद्दा समोर आल्यानंतर २६ जुलै २०१६ रोजी अधीक्षक अभियंत्यांकडे झालेल्या बैठकीनंतर सर्व सदोष वीज मीटर बदलली जातील, असे आश्वासन देण्यात आलेले होते. परंतु अद्याप ती बदलण्यात आलेली नाहीत.

मला दरमहा ५०० रुपये वीज बिल येते परंतु अचानक १४ हजार रुपयांचे देयक आले आहे. मी शनिवारपासून विविध कार्यालयात वीजदेयक कमी करण्यासाठी फेऱ्या मारत आहे. माझा आजचा रोजगार बुडाला.

-उमाशंकर गुप्ता, ग्राहक,  धानिवबाग

माझे वीजमीटर सदोष आहे. मी मागच्या वर्षी वीजमीटर बदलण्यासाठी अर्ज केला होता, परंतु अजूनही माझे वीजमीटर बदललेले नाही आणि मला अवाजवी वीज बिल येत आहे.

– पंढरीनाथ जाधव, ग्राहक, गावराईपाडा

मला अवाजवी वीज देयक आले आहे. ते कमी करण्यासाठी मला सकाळपासून रांगेत उभे राहावे लागले. वसई एमआयडीसीतील एका कंपनीत मी कामाला आहे. सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत असल्याने माझ्या कामाचा खाडा झाला.

– शिवाजी साळुंखे, ग्राहक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2018 1:02 am

Web Title: vasai residents getting inflated power bills
Next Stories
1 शहरबात भाईंदर : बेकायदा मातीभरावाचे आव्हान
2 ठाण्यातील सीडीआरप्रकरणी मुख्य सुत्रधाराला दिल्लीतून अटक
3 दिवा येथे दुचाकीला एक्स्प्रेसने उडवले, दोघांचा मृत्यू
Just Now!
X