02 March 2021

News Flash

वसईतील एकपडदा चित्रपटगृहांना घरघर

वसई पश्चिमेला मााणिकपूर रोडवरील पार्वती चित्रपटगृह हे जुन्या सिनेमागृहापैकी एक सिनेमागृह होते.

चित्रपट न देण्याच्या वितरकांच्या धोरणाचा फटका

मल्टिप्लेक्सच्या अतिक्रमणात वसईतील एकपडदा चित्रपटगृहे एकापाठोपाठ एक बंद होऊ  लागली आहेत. वसईच्या पारनाका येथील मराठी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले ‘जानकी चित्रमंदिर’ हे चित्रपटगृह बंद झाल्यानंतर आता वसईतील प्रसिद्ध पार्वती सिनेमागृहही बंद झाले आहे. वितरकांकडून एकपडदा चित्रपटगृहांना मोठे सिनेमे न देण्याच्या धोरणामुळे सिनेमागृह बंद करावे लागत असल्याने पार्वती सिनेमागृहाच्या मालकांनी स्पष्ट केले.

वसई पश्चिमेला मााणिकपूर रोडवरील पार्वती चित्रपटगृह हे जुन्या सिनेमागृहापैकी एक सिनेमागृह होते. कोकणातून मुंबईत आलेले उद्योजक महादेव धुरी यांनी १९७४ साली पार्वती सिनेमागृह बांधले होते. मल्टिप्लेक्सच्या आगमनापूर्वी वसई रोड परिसरात ‘पार्वती’ आणि ‘के. टी. व्हिजन’ ही दोनच सिनेमागृहे होती. वसईच्या पारनाका येथे ‘जानकी’ आणि वसई गावात सपना सिनेमागृह होते. नालासोपारा येथे ‘धनंजय’ आणि विरार येथे ‘वुडलँड’ सिनेमागृह आहे, परंतु मल्टिप्लेक्सच्या आगमनानंतर एकपडदा चित्रपटगृहांना घरघर लागली आणि ती एकामागूनएक बंद पडू लागली. नालासोपारा येथील ‘धनंजय’ सुमारे वीस वर्षांपूर्वीच बंद पडले होते, तर सपना चित्रपटगृहही बंद पडले. पारनाका येथील ‘जानकी’, विरारमधील ‘वुडलँड’ आणि वसईतील ‘पार्वती’ ही तीन सिनेमागृहे शिल्लक होती. ‘के. टी. व्हिजन’ या सिनेमागृहाने काळाची गरज ओळखून एकपडदा चित्रपटगृहांना मल्टिप्लेक्समध्ये रूपांतरित केले. जानकी चित्रमंदिरात मराठी सिनेमे लागायचे. परंतु हे सिनेमागृह देखील २०१५ मध्ये बंद करण्यात आले.

आता पार्वती सिनेमागृहदेखील बंद करण्यात आल्याने वसईतील रसिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी सिनेमागृह बंद ठेवण्यात आल्याचा फलक बाहेर लावण्यात आला आहे. मात्र सिनेमागृह कायमस्वरूपी बंद केल्याचे पार्वतीचे मालक सचिन धुरी यांनी सांगितले. मल्टिप्लेक्सच्या अतिक्रमणातही आम्ही आमचे सिनेमागृह टिकवून ठेवले होते. परंतु वितरकांकडून सहकार्य मिळत नव्हते. आम्ही २००४ मध्ये नूतनीकरण करून वातानुकूलित व्यवस्था, आरामदायी आसन बनवले होते. सोमवार ते शुक्रवार ४५ रुपये तिकीट दर ठेवला होता. त्याचा फटका मल्टिप्लेक्स सिनेमागृहांना बसायचा. त्यामुळे ते आम्हाला मोठे सिनेमे देत नव्हते, असे धुरी यांनी सांगितले. ऐनवेळी मोठय़ा बॅनरचे सिनेमे देण्यास वितरकांनी नकार दिल्याने मागील वर्षी तीन वेळा सिनेमागृह बंद ठेवावे लागले होते, असे ते म्हणाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, परंतु काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता नाईलाजाने हे चित्रपटगृह बंद करावे लागत असल्याचे धुरी यांनी सांगितले.

केवळ एकच चित्रपटगृह सुरू

एकपडदा चित्रपटगृहांना भोजपुरी आणि ‘ब’ दर्जाचे चित्रपट देण्यासाठी वितरक तयार होतात. त्यांना प्रेक्षकवर्ग मिळतो, पण त्यामुळे प्रतिमा खराब होत असल्याने असे सिनेमे घेण्यास पार्वती सिनेमागृहाच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. पार्वती बंद झाल्याने आता केवळ विरारमधील वुडलँड हे एकमेव एकपडदा चित्रपटगृह शिल्लक राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 3:04 am

Web Title: vasai single screen cinema theatres
Next Stories
1 राखलेले जंगल आदिवासींना ‘लाभ’णार
2 पवारांविरोधी विखारी लिखाण; ठाण्यात गुन्हा दाखल
3 डोंबिवलीत राज्यातील पहिले सायकलप्रेमींचे संमेलन..
Just Now!
X