वसई तालुक्यातील नायगाव पूर्व परिसरात नक्षत्र ट्विन्स टॉवर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या विनोद कुमार शर्मा यांच्या घरी गॅस गळतीमुळे अचानक आग लागली. यावेळी सोसायटीमधील सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जळता सिलेंडर हाताने उचलून पहिल्या मजल्यावरून धावत नेवून सोसायटी शेजारील गटारात नेवून टाकला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सिलेंडरला आग लागल्याने शर्मा यांच्या घराच्या किचनमधील सामान जळून खाक झालं, पण सुरक्षा रक्षकामुळे जीवितहानी टळली.

विनोद कुमार शर्मा यांनी 2 दिवसांपूर्वीच आपल्या घरातील गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर बदलले होते. त्यावेळी गॅस गळती होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं, पण त्यांनी त्यावर जास्त लक्ष दिले नाही. परंतु काल त्यांच्या पत्नीने घरातील काम करण्यासाठी गॅस पेटवला असता गॅस गळतीमुळे अचानक आग लागली.  त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा इमारतीमधील लोकांनी धाव घेतली, नंतर अग्नीरोधक यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र जळत्या गॅस सिलेंडरमुळे कोणत्याही क्षणी सिलेंडरचा स्फोट होईल अशी भीती लोकांमध्ये होती.

अशात इमारतीचा सुरक्षारक्षक संजय पाल पुढे आला. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मागचा पुढचा कसलाही विचार न करता आग लागलेला गॅस सिलेंडर हातात घेऊन धावत सुटला. त्याने इमारतीच्या बाहेर असलेल्या गटारात नेऊन तो सिलेंडर टाकला आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या हिंमतीमुळे अनेकांचा जीव बचावला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही, यासाठी सुपरमॅन सुरक्षारक्षकावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.