|| सुहास बिऱ्हाडे

वसई-विरार महापालिकेचे अंदाजपत्रक सादर

मोफत आरोग्य सेवा, नवीन उड्डाणपूल, सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे, अत्याधुनिक वाचनालये, उद्यानांचे सुशोभीकरण आदी विविध योजनांचा समावेश असणाऱ्या २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठीच्या २ हजार २६३ कोटी ९५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. वसई-विरार महापालिकेचा २०१८-१९च्या सुधारित अंदाजपत्रकासह २०१९-२०चे मूळ अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायीला सादर केला. त्यावर सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षांचा २५९ कोटी ५१ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त सतीश लोखंडे यांनी स्थायी समितीला सादर केला. या अंदाजपत्रकावर सोमवारी स्थायी समितीच्या विशेष बैठकीत चर्चा करण्यात आली आणि हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यावर चर्चा करून तो सभागृहाला अंतिम मंजुरीसाठी २२ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. आयुक्तांनी सादर केलेले २०१८-१९चे सुधारित अंदाजपत्रक १ हजार ७४८ कोटी ८५ लाखांचे होते, तर २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी २ हजार २६३ कोटी ९५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक आहे. त्यात २५९ कोटी ५१ लाख शिलकी दाखवण्यात आली आहे.

महापालिकेने यंदा उत्पन्नाचे मार्ग विकसित केले असून भरीव उत्पन्नाची वाढ या अंदाजपत्रकात समाविष्ट केली आहे. मालमत्ता कराच्या चालू आर्थिक वर्षांतील २१० कोटी उत्पन्नावरून २९२ कोटी उत्पन्नांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. नवीन बांधकामांना पाणी जोडणी देतानाचे अपेक्षित उत्पन्न १०० कोटी ठेवण्यात आले आहे. नगररचना विभागाच्या अखत्यारितीतील विविध करांचे उत्पन्न चालू आर्थिक वर्षांत केवळ १३० कोटी होते ते वाढवून ३२३ कोटी उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. याशिवाय विविध योजना आणि प्रकल्प या आर्थिक वर्षांत राबविण्यात येणार आहे.

आम्ही सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प तयार केला होता. तो स्थायी समितीपुढे सादर केल्यानंतर सोमवारी सकारात्मक चर्चेनंतर मंजूर करण्यात आला.   – सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका

यंदा उत्पन्नवाढीवर आम्ही लक्ष केंद्रित केले होते. शहरातील सर्व घटकांना कसा लाभ देता येईल याचा विचार करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांना घरे, तलावांचा विकास, अद्ययावत आरोग्य आणि अग्निशमन यंत्रणा, जिल्हा परिषद शाळांचा विकास आदींबाबत आम्ही या अंदाजपत्रकात सूचना करून त्याला मंजुरी दिली आहे. २२ फेब्रुवारीला त्यात किरकोळ दुरुस्ती करून तो महासभेत अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल.    – सुदेश चौधरी, सभापती, स्थायी समिती

अग्निशमन विभाग अत्याधुनिक

अग्निशमन विभागात अनेक अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश केला जाणार आहे. त्यात हॅमजेट व्हॅन व फायर बलूनचा समवाश आहे. याशिवाय रिमोटने अपडेट करणारे वॉटर टॉवर. ७० मीटर उंच शिडीसह अत्याधुनिक यंत्रणा आणली जाणार आहे. याशिवाय नवीन अग्निशमन उपकेंद्रे बनवण्यात येणार असून त्यासाठी ४८ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे

मागासवर्गीयांच्या निधीत वाढ : विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय कल्याण निधीत तब्बल २० कोटी रुपयांची वाढ करण्यात आल आहे.

सौर ऊर्जेवर भर

पालिकेने सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये, आरोग्य केंद्र आणि इतर आस्थापनांमध्ये सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.

उद्यानांचा विकास

पालिकेतर्फे विरारच्या यशवंत नगर, नारिंगी, वसईच्या कौलसिटी येथे थिम उद्यान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सिग्नल यंत्रणा

शहरात भूमीगत केबल व्यवस्था आणि २१ ठिकाणी नवीन सिग्नल बसवण्यात येणार असून त्यासाठी ५१ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नवीन श्वान निर्बीजीकरण केंद्र

पेल्हार येथे श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारले जाणार आहे. शहरातील श्वानांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अद्ययावत निर्बीजीकरण केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ७० लाख रुपयांची तरतूद. याशिवाय शहराच्या बाहेर कत्तलखाना उभारण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा मोफत

२०१९-२० या आर्थिक वर्षांपासून संपूर्ण आरोग्य सेवा मोफत केली जाणार आहे. याशिवाय नारिंगी आणि बोळींज येथे माता बालसंगोपन केंद्र, उमराळे, गौराईपाडा, विराट नगर येथे शवागृह, चंदनसार येथे ट्रॉमा केंद्रे उभारले जाणार आहेत.

अत्याधुनिक वाचनालये

शहरातील पालिकेच्या सर्व वाचनालयाच महाराष्ट्र लोकसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आदी सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

योजना काय काय?

सफाई कर्मचाऱ्यांना घरे  पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देणार आहे. वसईतील लक्ष्मी निवास ही सफाई कर्मचाऱ्यांची इमारत तोडून तिथे मोठी इमारत बनवणार आणि अधिकाधिक सफाई कर्मचाऱ्यांना हक्काची घरे देणार आहे. याशिवाय शहरातील इतर भागांतही सफाई कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देणार.

तलावांचे सुशोभीकरण

शहरातील पापडी, गांधी, वाकणपाडा, नंदू किणी, तांडापाडा, उतळेश्वर, राममंदिर या तलावांचे पुनर्जीवितीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती

शहरातील जिल्हा परिषदांच्या शाळांची दुरवस्था झालेली आहे. त्यासाठी पालिका आता जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन या शाळांची दुरुस्ती करणार आहे.

५१ बाजारपेठा

शहरात लहान मोठे ५१ बाजारपेठा विकसित केल्या जाणार असून त्यासाठी १० कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.