News Flash

शहरबात : शहराला अग्निधोका!

इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षणही (फायर ऑडिट) झालेले नाही. वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत.

fire in saudi
प्रातिनिधिक छायाचित्र

वसई-विरार शहराला आगीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. इमारतींनी अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन केलेले नाही. नियमांची पायमल्ली करून बांधकामे होत आहे. इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षणही (फायर ऑडिट) झालेले नाही. वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. अग्निशमन उपकेंद्रे रखडली आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदारीची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

मोठी दुर्घटना घडल्याशिवाय शासकीय यंत्रणेला जाग येत नाही ही भारतीय व्यवस्थेची शोकांतिका आहे, असे म्हटले जाते. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाबाबत सध्या असेच म्हणायची पाळी आहे. कारण शहराची वाढती लोकसंख्या, दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या इमारती पाहता चोख अग्निसुरक्षेची गरज आहे. पण हे शहर सध्या आगेच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षणच झालेले नाही. अग्निसुरक्षा परीक्षण करून घेणे किती गरजेचे आहे हे जनतेला माहीत नाही की ते करून घेण्यासाठी यंत्रणा राबवण्याची पालिकेची तीव्र इच्छाशक्ती दिसत नाही. आग लागल्यावर तात्काळ पोहोचता यावे यासाठी शहरात सहा ठिकाणी अग्निशमन उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. ही अग्निशमन उपकेंद्रे रखडलेली आहेत. आग लागल्यावर संपर्क करण्यासाठी असलेला १०१ क्रमांक वसईकरांच्या मोबाइलमधून लागत नाही. ही परिस्थिती आताची नसून गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे आणि त्यात काही फरक पडलेला नाही हे विशेष.

वसई-विरार महापालिकेची स्थापना २००९ मध्ये झाली. सध्या अनधिकृत आकडेवारीनुसार वसई-विरार शहराची लोकसंख्या २० लाखांहून अधिक झालेली आहे. शहरात दाटीवाटीने इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. नवनवीन वसाहती उभ्या रहात आहेत. गर्दीच्या शहरांना ज्या मूलभूत सुविधांची किंवा गरजांची गरज असते, त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे आगीपासून सुरक्षित ठेवण्याची प्राथमिक आवश्यकता. परंतु महापालिकेचा अग्निशमन विभाग त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या गर्दीच्या शहराला आगीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कारण अद्याप निवासी इमारती, व्यावसायिक इमारती शाळा, रुग्णालये, मॉल, सरकारी इमारती आदी आस्थापनांचे अग्निसुरक्षा परीक्षणच झाले नसल्याचे उघड झाले आहे. वसई-विरार महापालिकेकडे सहा अग्निशमन केंद्रे असून एकूण २३२ कर्मचारी आणि अग्निशमन जवान आहे. १६ चार चाकी वाहने असून ७ अग्निशमन दुचाक्या आहेत. मनुष्यबळाची कमतरता आणि शहराचा वाढलेला पसारा पाहता फायर ऑडिट करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी ज्या आस्थापना आहेत, त्या आगीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत का, आग लागू नये म्हणून उपाययोजना केलेल्या आहेत का याची अग्निशमन विभागामार्फत केली  जाणारी तपासणी म्हणजेच अग्निसुरक्षा परीक्षण होय. २००९मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेच्या वतीने १८ वर्षांत अग्निसुरक्षा परीक्षण केलेले नाही. मुंबई महापालिकेने शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अग्निसुरक्षेवर भर दिला आहे. त्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते, साहाय्यक अभियंता (इमारत व कारखाने), अनुज्ञापन खाते आणि विधी विभाग इत्यादी संबंधित खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वसई-विरार महापालिकेत असे संयुक्त पथक नाही.

टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व आस्थापनाचे अग्निसुरक्षा परीक्षण सुरू करणार असल्याचे गेल्या वर्षी अग्निशमन प्रमुखांनी सांगितले होते. आम्ही प्राथमिकता तयार केली असून सुरुवातीला शहरातील सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण केले जाईल. त्यानंतर सर्व शैक्षणिक संस्थांचे अग्निसुरक्षा परीक्षण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप त्यात फारशी प्रगती झालेली नाही.

शहराची अग्निसुरक्षा बळकट करण्यावर पालिकेने भर देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात लागलेल्या आगीच्या घटनांनतर अग्निसुरक्षेच्या नियमांना कसे पायदळी तुडविण्यात आले होते ते दिसून आले. प्रत्येक आगीच्या घटनांनतर हेच दिसून येत आहे. नागरिकांनीही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. थोडीशी निष्काळजी भविष्यात मोठय़ा संकटाला आमंत्रण देऊ  शकते.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा

मुख्य अग्निशमन अधिकारी, स्थानक अधिकारी आणि उपस्थानक अधिकारी दर्जाचे अधिकारीच केवळ अग्निसुरक्षा परीक्षण करू शकतात. गेली अनेक वर्षे वसई-विरार महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी पद रिक्त होते. ते उशिराने भरण्यात आलेले आहे. अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे अधिकार ज्या अधिकाऱ्यांकडे आहे त्यांची पदेच रिक्त असल्याचे समोर आले आहे, परंतु अद्याप स्थानक अधिकारी आणि उपस्थानक अधिकारी ही पदे भरली गेलेली नाहीत. हे अधिकारी संबंधित आस्थापनांची पाहणी करतात. आग लागू नये म्हणून खबरदारी घेतलेली आहे का, आग लागल्यास सुरक्षित सुटकेसाठी मार्गात अडथळे आहेत का, अग्निरोधक यंत्रे सुस्थितीत आहेत का, तेथील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्व बाबी तपासून संबंधित इमारतीला अग्निसुरक्षा परीक्षण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. अग्निसुरक्षेत अनधिकृत बांधकामे हटवणे, नियमानुसार आवश्यक मोकळ्या जागा सोडणे, अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करून घेणे, वायुविजन यंत्रणा कार्यान्वित करून घेणे आवश्यक असते. सध्या पालिकेचे एकच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे अधिकार आहेत. शहराचा अवाढव्य पसारा पाहता ते कितपत अग्निसुरक्षा परीक्षण करू शकतील हा प्रश्न कायम आहे.

सर्वाधिक धोका उद्योगांना

वसई-विरार परिसरातील औद्य्ोगिक क्षेत्रात अनेक छोटय़ा-मोठय़ा कंपन्या आहेत. येथे तयार होणारी उत्पादने वेगवेगळ्या भागात निर्यात केली जातात, परंतु औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कंपन्यांमध्ये नेहमी स्फोट आणि अपघात होत असतात. गेल्या काही महिन्यांत औद्योगिक कंपन्यांत आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमध्ये आग लागून दुर्घटना घडण्याचे प्रकार वारंवार होत असतात, त्यामुळे जीवितहानी व वित्तहानी प्रचंड प्रमाणात होते. या सर्वाची दखल घेण्यासाठी वसई-विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यातील संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार

संबंधितास आवश्यक त्या, आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना करावयाची माहिती दिली जाणे गरजेचे आहे. महापालिकेकडून हे प्रयत्न तोकडे पडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2017 4:00 am

Web Title: vasai virar city face biggest threat of fire due rules not followed
Next Stories
1 पाऊले चालती.. : कळव्यातील ‘नक्षत्र’ पहाट
2 नवीन दप्तर, नवीन शाळा, नवीन मित्र आणि किलबिलाट
3 खासगी करणाच्या माध्यामातून ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास होणार
Just Now!
X