वसई-विरारमधील मैदानांसाठीच्या१३४ भूखंडांवर अतिक्रमण

विरार : वसई-विरार शहरांतील क्रीडांगणांसाठी राखीव असलेले भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केले आहेत. शहरात १३८ भूखंड खेळांच्या मैदानांसाठी आरक्षित असून त्यापैकी तब्बल १३४ भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोणत्या प्रभागात किती आणि कुठे आरक्षित भूखंड आहेत याची कोणतीच माहिती महापालिकेकडे नाही.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत. सरकारी जागा, वनजमिनी भूमाफियांनी गिळंकृत केलेल्या आहेत; परंतु पालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी नागरी सोयीसुविधांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अतिक्रमणे होत आहेत. मुलांना खेळण्यासाठी महापालिकेकडून अनेक भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र या भूखंडांवरही अतिक्रमण करण्यात आल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच नसल्याचे दिसून येत आहे.

वसईमध्ये विविध ठिकाणी कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यातून खेळाडूंची निर्मिती होत असते; पण अद्ययावत खेळांच्या सुविधा आणि मैदाने नसल्याने अनेक खेळाडूंचा विकास खुंटत आहे. शहरात आवश्यक मैदाने व सुविधा नसल्याने होतकरू खेळाडू नाइलाजाने मुंबई-ठाण्यासह अन्य शहरांकडे धाव घेत आहेत. सातत्याने मैदानवर अतिक्रमण सुरू असल्याने येथील मुलांनी खेळण्यासाठी जायचे तरी कुठे, असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. आरक्षित भूखंडांवर अनेक ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या आहेत. तर काही ठिकाणी चाळी, औद्योगिक गाळे उभारले आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार परिसरांत १३८ भूखंड हे मैदानासाठी आरक्षित करण्यात आले आहेत; पण त्यापैकी १३४ भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. त्यातील २४ भूखंड महापालिकेने ताब्यात घेतले आहेत, तर ५ भूखंड विकसित केले आहेत. २२ भूखंड प्रस्तावित आहेत. कोणत्या प्रभागात किती आणि कोठे मैदानाचे आरक्षित भूखंड आहेत याची माहिती महापालिकेकडे नाही.

मैदानांचा समारंभांसाठी वापर

शहरातील अनेक मैदानांवर अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. हे अतिक्रमण हटवण्यास महापालिका असमर्थ आहे. जी मैदाने खुली आहेत, त्यातील मैदाने खेळासाठी कमी आणि भाडय़ानेच जास्त दिली जातात. त्यामुळे खेळाडूंचा हिरमोड होतो. विविध कार्यक्रमांसाठी मैदाने सातत्याने भाडय़ाने दिले जातात. विविध जत्रा भरवल्या जातात. यामुळे खेळासाठी मैदानांचा वापर करता येत नाही.

खेळाच्या मैदानांसाठी असलेल्या आरक्षित भूखंडावर महापालिका स्थापनेच्या पूर्वीपासून अतिक्रमण होत आहे. महापालिका स्थापनेनंतर महापालिकेने धोरण अमलात आणून त्यावर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. पालिकेने काही भूखंडांचा ताबा घेऊन त्यांना विकसित केले आहे. पालिका सतत कारवाई करून मैदाने मोकळी करण्याचा प्रयत्न करत आहे. – किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महापालिका