वसई-विरार शहरात शिक्षण विभागात अपुरे कर्मचारी, कामांत अडचणी

कल्पेश भोईर , लोकसत्ता

वसई : वसई-विरार शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या सोबतच शाळांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे, परंतु मागील काही वर्षांपासून वसईच्या शिक्षण विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने कामात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वसईत एक हजाराहून अधिक पदे मंजूर आहेत, परंतु त्यातील केवळ ७५२  इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत.

वसई विरार शहरात अनधिकृत शाळांचे जाळे वेगाने पसरू लागले आहे. त्यातच शिक्षण विभागाचे दैनंदिन कामकाज या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून शिक्षण विभागाला मनुष्यबळ मिळत नसल्याने आहे त्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार सोपवून कामकाज  करावे लागत आहे. वसईत शहरी व ग्रामीण मिळून एकूण ९६९  शाळा आहेत. या शाळांचे नियंत्रण वसईच्या शिक्षण विभागाकडून पाहिले जाते. तसेच शिक्षणाच्या संबंधित  शासनाचे विविध उपक्रमही राबविले जातात. यामध्ये  गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, लिपिक, केंद्रप्रमुख, सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. वसईत सात विस्तार अधिकारी यांची पदे मंजूर आहेत त्यातील ३ विस्तार अधिकारी कार्यरत आहे. विविध विभागांनुसार लक्ष ठेवण्यासाठी केंद्रप्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामध्येही १३ पैकी केवळ ७ केंद्र प्रमुख कार्यरत आहेत, त्यामुळे विविध प्रकारची कामे करताना अडचणी निर्माण होत असल्याचे शिक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. शिक्षक कर्मचारी कमी असल्याने प्रत्येक कामाचे नियोजन करण्यासाठी अडचणी निर्माण होतात, तर काही कर्मचारी हे सेवानिवृत्त होतात, त्यामुळे त्या ठिकाणी नवीन कर्मचारी येईपर्यंत त्या कर्मचाऱ्यांची कामेही अतिरिक्त भार देऊन करवून घ्यावी लागत आहे.

अनधिकृत शाळांवर नियंत्रण ठेवण्यास अडचणी

वसई-विरार शहराचे झपाटय़ाने विकास होऊ लागला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी अनधिकृतपणे शाळाही उभ्या राहू लागल्या आहेत. वसईत या वर्षी ११२ अनधिकृत शाळा आढळून आल्या आहेत. त्यात प्राथमिक ७२ व माध्यमिक ४० यातील बहुतांश शाळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०, तर विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०, परंतु कारवाईची मोहीम तीव्र करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. मात्र मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने कारवाई करण्यासाठी अडचणी निर्माण होत असतात. यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनधिकृत शाळांवर अंकुश ठेवणे हे शिक्षण विभागाच्या समोरील मोठे आव्हान आहे.

वसईच्या शिक्षण विभागात अजूनही बहुतेक पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार देऊन कामकाज चालविले जात आहे. या अतिरिक्त भारामुळे कर्मचारी वर्गाचीही धावपळ होत असते. पुरेशा प्रमाणात कर्मचारी मिळावेत यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

— माधवी तांडेल, प्रभारी गटशिक्षणाधिकारी वसई