सुखरूप परतलेल्या मच्छीमारांचे अंगावर शहारे आणणारे अनुभव

१९ सप्टेंबरच्या तुफान वादळात अडकलेल्या आणि नंतर संपर्काबाहेर गेलेल्या मच्छीमारी नौका अखेर किनाऱ्यावर सुखरूप परतू लागल्या आहेत. बोटीवरील मच्छीमार आणि खलाशी सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वादळ आणि अस्मानी संकटामुळे साक्षात काळ समोर आला होता, पण दैव बलवत्तर असल्याने आम्ही सुखरूप परतलो, अशी प्रतिक्रिया या मच्छीमारांनी दिली. एका मच्छीमाराचा पाय या वादळामुळे जायबंदी झाला आहे.

वसई-विरारच्या बंदरातून १६ सप्टेंबर रोजी शेकडो बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. मात्र १९ सप्टेंबर रोजी समुद्रात वादळ आले आणि बोटी भरकटू लागल्या. दुसऱ्या दिवशी वादळ शमल्यानंतर बोटी किनाऱ्यावर मासेमारी न करताच येऊ  लागल्या, परंतु खोल समुद्रात गेलेल्या अनेक बोटी वादळामुळे अडकून पडल्या होत्या. वादळाचा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता, असे तारणहार बोटीवरील मच्छीमार जॉन्सन सौदिया याने सांगितले. ‘‘आम्ही किनाऱ्यापासून दहा तास आत समुद्रात होतो. कित्येक वर्षांत प्रथमच असे वादळ अनुभवले होते. उंच लाटांमुळे बोटी हेलकावे खात होत्या. त्यामुळे बोट पुढे न देता स्थिर ठेवली. पण ती वादळाची रात्र काळरात्र ठरत होती. आमच्या बोटीवर १५ जण होतो. आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. कुणाशीच संपर्क करता येत नव्हता..,’’ असे जॉन्सनने सांगितले. वादळ शमल्यानंतर मच्छीमारीला सुरुवात केली, परंतु संपर्काचे काहीच साधन नसल्याने आम्ही कुणाला सांगू शकलो नाही. आमचे कुटुंबीय धास्तावले होते, असे तो म्हणाला.

मच्छीमाराचा पाय जायबंदी

वादळातून मच्छीमार बचावले असले तरी काही जणांना दुखापत झाली आहे. राजकुमार या बोटीवरील सावरो बला या मच्छीमाराचा पाय जायबंदी झाला आहे. वसई-विरारमधून मासेमारीसाठी गेलेल्या पंधरा ते वीस बोटी किनाऱ्यावर परतल्या असून सर्व मच्छीमार सुखरूप आहेत. ‘तारणहार’, ‘हलेलुईया’, ‘मॉर्निग स्टार’, ‘याझेक’, ‘यारझेन’, ‘मसिहा’ या बोटी सुखरूप किनाऱ्यावर आल्या आहेत.

प्रशासनाबद्दल कुटुंबीयांची नाराजी

ज्या बोटी किनाऱ्यावर आल्या नाहीत, त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. ते सतत देवाची प्रार्थना करत होते. मात्र अशावेळी एकही लोकप्रतिनिधी त्यांच्या भेटीला गेला नसल्याबद्दल मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. ‘लोकसत्ता’ने या मच्छीमारांचा प्रश्न समोर आणल्याबद्दल वसई मच्छीमार सर्वोदय सोसायटीचे संचालक मिल्टन सौदिया यांनी आभार मानले. त्याचवेळी समाजमाध्यमात चुकीचे संदेश प्रसारित केल्याबद्दल खंत व्यक्त केली. हवामान खात्याने

किमान आठवडाभर आधी संदेश द्यायला हवा होता, पण ज्या दिवशी वादळ आले, त्याच दिवशी धोक्याचा संदेश दिल्याचे ते म्हणाले. आमच्या मच्छीमार बोटींचा संपर्क होत नव्हता, अशावेळी त्यांचा शोध घेणे किंवा संपर्कासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, पण असा प्रयत्न झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.