पालिकेचा अजब निर्णय, कचराकुंड्यांची नागरिकांना प्रतीक्षा कायम

वसई : वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रातील बहुतांश भागातील कचराकुंड्यांची दुरवस्था झाली असल्याने पालिकेकडे नवीन कचराकुंड्या कचरा टाकण्यासाठी उपलब्ध कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. परंतु कचराकुंड्या हव्या असतील तर आधी मालमत्ता कर भरा मगच कचराकुंड्या देऊ , असा अजब निर्णय पालिकेने घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील घनकचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन व्हावे व शहरातील स्वच्छता अबाधित राहावी यासाठी महापालिका परिसरात कचरा टाकण्यासाठी जागोजागी निळ्या व हिरव्या रंगाच्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या व सोसायट्यांनासुद्धा कचराकुंड्या देण्यात आल्या होत्या, परंतु देण्यात आलेल्या कचराकुंड्या तुटून फुटून गेल्या आहेत. तर काही ठिकाणच्या भागात कचराकुंड्याच नसल्याने नागरिक थेट रस्त्यावर कचरा फेकून देत आहेत.

यासाठी शहरात कचराकुंड्यांची कमतरता भासू लागली आहे. त्यातच पालिकेने ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. जर कचराकुंड्याच उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत तर  नागरिक ओला सुका कचरा वेगळा करणार कसा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.  पालिकेने २०१९ च्या महासभेत १५ हजार नवीन कचराकुंड्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला होता.  त्यातील आतापर्यंत ४ हजार कचराकुंड्या खरेदी केल्या आहेत. या कुंड्यांचे सोसायट्यांना वाटप करताना आधी कर भरणा केल्याची पावती दाखवा मगच कचराकुंडी पुरविली जाईल, असे सांगितले जात आहे.

कचराकुंड्याही अपुऱ्या

वसई-विरार  शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. नव्याने इमारतीसुद्धा तयार होत आहेत त्यामुळे कचराकुंड्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. याआधी पालिकेने मागील सहा वर्षांत जवळपास ३७ हजार ५०० इतक्या कचराकुंड्यांची खरेदी केली होती. मात्र या कचराकुंड्यांची योग्यरीत्या निगा राखली गेली नसल्याने त्यांची दुरवस्था झाली. यासाठी नव्याने १५ हजार कचरा कुंड्या कराव्या लागत आहेत. परंतु शहराच्या तुलनेत त्याही अपुऱ्या  आहेत.

नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा

शहरात तयार होणारा कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र मालमत्ता कर भरा अन्यथा कचराकुंडी मिळणार नाही ही भूमिका नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. करोना महामारीमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी  तातडीने  कर भरणे शक्य नाही.  सवलत देण्याऐवजी  १०० टक्के  कर भरायला लावणे हे  वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकांनी कर भरावा यासाठी हा निर्णय  आहे.  कर भरत आहेत आणि त्यांना कचराकुंड्यांचे वाटप सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार नवीन कचराकुंड्या आणल्या आहेत. डिसेंबर अखेरपर्यँत त्याचं वाटप होईल.

– गंगाथरन डी, आयुक्त, वसई -विरार महापालिका

घरपट्टी कर भरल्याच्या पावत्या दाखवून त्यानंतर त्यांना किती कचराकुंड्यांची आवश्यकता आहे याची मागणी करावी.  त्यानुसार सर्व माहिती तपासून  कचराकुंड्या पुरविल्या जातील.

– निलेश जाधव, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी, महापालिका.