वसई-विरार महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर

वसई : वसई विरार महापालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसांठी एकूण ११५ प्रभाग निश्चित करण्यात आले असून ५८ प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेक मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांचे प्रभागही महिलांसाठी राखीव झाले आहेत.खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ३६, इतर मागासवर्गीय महिलांसाठी १६ आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी प्रत्येकी पाच प्रभाग आरक्षित करण्यात आलेले आहेत.

वसई-विरार महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक जून २०२० रोजी होणार आहे. २००१च्या लोकसंख्येनुसार यंदा ११५ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्या प्रभागांच्या महिला आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली. या वेळी पालघरचे जिल्हाधिकारी तथा वसई-विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे उपस्थित होते. सकाळी ११ वाजता अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण जाहीर केल्यानंतर सोडत पद्धतीने महिला, ओबीसी यांचे आरक्षण काढण्यात आले. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला होता.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर २०१० आणि २०१५च्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती-जमातींचे प्रभाग वगळल्यानंतर एकूण १० प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील महिलांसाठी प्रत्येकी ३ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.

ओबीसींसाठी ३१ प्रभाग आरक्षित

२०१० आणि २०१५च्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी जे प्रभाग आरक्षित होते, ते प्रभाग वगळण्यात आले. सोडत पद्धतीने ३१ प्रभाग इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यातील १६ प्रभाग हे ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले.

महिलांसाठी ५८ प्रभाग तर खुल्या वर्गासाठी केवळ ३८ प्रभाग

यंदा पालिकेत ५८ नगरसेविका दिसणार आहे. प्रभाग रचनेत सर्वसाधारण खुल्या वर्गातील महिलांसाठी ३६ प्रभाग आरक्षित करण्यात आले. इतर मागासवर्गीय महिला १६ आणि अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक ३ मिळून एकूण ५८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत.

महापौर, उपमहापौरांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित

वसई-विरार महापालिकेत ११५ पैकी ५८ जागा महिलांसाठी आरम्क्षित झाल्याने अनेक मातब्बर नगरसेवकांना फटका बसला आहे. महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, सभापती निलेश देशमुख, सभापती यज्ञेश्वर पाटील, माजी स्थायी समिती सभापती हफीफ शेख आणि सुदेश चौधरी, माजी उपमहापौर आणि बविआचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक, शिवसेनेचे स्वप्निल बांदेकर, धनंजय गावडे, भाजपचे किरण भोईर यांचे प्रभाग महिसांठी आरक्षित झालेले आहे. याशिवाय सभापती सरिता दुबे, शिवसेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांचे महिलांसाठी असलेले प्रभाग सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी खुले झाले आहेत. त्यामुळे पुन्हा नगरसेवक बनण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. एकतर त्यांना अन्य नव्या प्रभागातून निवडणुका लढवावी लागणार आहे. मात्र त्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी संबंधित प्रभागातील उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

कोणत्या प्रभागात आरक्षण?

खुला वर्ग- एकूण जागा ३८

२८, ३७, ४६, ९१, १०९, २०, ५६, ९२, ३९, ६६, ४, १३, २२, ४९, ५८, ६७, ७६, १०३, १४, ५०, ५९, ६८, ७७, ३३, ६९, ७८, ८७, ११४, १६,  २५, ६१, ८९ ,९८, ९, १८, २७, ७२, ८१

महिला खुला प्रभाग- एकूण जागा ३६

२, ३, ४५, ४७, ५४, ६०, ६२, ७१, ७३, ८५, ९३, ९६, ९७, १०६, १६, १९, २१, ३२, ३५, ३६, ३८, ४४, ५२, ५७, ८०, ८२, ८४, ९४, ९५, १०१, १११, ४३, ६४, १७

ओबीसी महिला- १६ जागा

१००, १०, ११०, ८३, ३०, ४८, ४०, ४१, ८६, ११३, ५१, ७०, ११५, ०८, ६३, १०५

ओबीसी पुरुष- १५ जागा

५५, ११, २९, ६५, १२, ३०, १०२, ३१, ४०, ०८, २६, ५३, ६३, ९९, १०८

अनुसूचित जाती- एकूण जागा ५

७, २३, ४, ७९, ११२

अनुसूचित जमाती- एकूण जागा ५

७४, ७५ ,८८, ९०, १०७

लोकसंख्या जरी वाढलेली असली तरी सध्या नवीन जनगणना झालेली नाही. त्यामुळे २०११च्या जनगणनेनुसार असलेली १२ लाख ३४ हजार ही लोकसंख्या गृहीत धरून ११५ प्रभागांची रचना करण्यात आलेली आहे. महिलांना सर्वाधिक म्हणजे ५८ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात प्राधान्यक्रम ठरवून सोडत काढण्यात आली. ज्या जागा पूर्वी महिलांसाठी आरक्षित नव्हत्या त्यांना आरक्षणासाठी प्राधान्य देण्यात आले – डॉ. कैलास शिंदे, प्रभारी आयुक्त, वसई-विरार महापालिका