दोन महिन्यांत साडेसहा लाखांचा दंड वसूल

वसई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई-विरार पालिकेने ऑक्टोबर महिन्यांपासून मुखपट्टीविना फिरणे, सामाजिक दुरीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला होता. मागील दोन महिन्यांत विनामुखपट्टी फिरणाऱ्या ६ हजार ८७५ जणांवर पालिकेने कारवाई केली असून त्यांच्याकडून ६ लाख ८७ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

टाळेबंदीतून शिथिलता मिळाल्याने जनजीवन पूर्वपदावर येताच नागरिक घराच्या बाहेर पडू लागले आहेत. परंतु घराच्या बाहेर पडताना अनेक जण मुखपट्ट्या न लावता फिरणे, सामाजिक दुरीच्या नियमांचे पालन न करणे, विनाकारण गर्दी करणे असे प्रकार समोर येत होते. यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता होती. याला नियंत्रित करण्यासाठी पालिकेने १ ऑक्टोबरपासून मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर १०० रुपये दंडआकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिकेच्या नऊ  प्रभागांतून कारवाईसाठी पथके नेमून कारवाईची सुरुवात केली आहे. दोन महिन्यांत नऊ  प्रभागांतून ६ लाख ८७ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणताना देण्यात येत असलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना करोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन  दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यासाठी  नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, आपापसात सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व थुंकू नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.