खासगी गृहसंकुलाच्या जागेचा वापर भंगाराचे सामान ठेवण्यासाठी

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येते. मात्र नालासोपारा पश्चिमेला एका खासगी गृहसंकुलाच्या जागेत वसई-विरार महापालिकेने अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाच्या कारवाईत जप्त केलेल्या वस्तू आणि भंगार महापालिकेने या गृहसंकुलाच्या आवारात ठेवले असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

नालासोपारा पश्चिमेला प्रभाग समिती ई कार्यालयाच्या बाजूलाच जयमाला सोसायटी आहे. या गृहसंकुलातील रहिवाशांना फिरण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. मात्र या मैदानाचा वापर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या गाडय़ा व इतर भंगाराचे साहित्य टाकण्यासाठी केला आहे. त्यामुळे रहिवाशांची व लहान मुलांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरातील टाकण्यात आलेले सामान पूर्ण गंजून गेले असून सोसायटीच्या मैदान परिसराची दुर्दशा झाली आहे.

भंगाराचे साहित्य बाजूला करण्यात यावे आणि मैदान खेळण्यासाठी मोकळे करण्यात यावे, असे पत्र पालिकेला देण्यात आले होते. मात्र या पत्राची पालिकेमार्फत दखल घेतली जात नसल्याने सोसायटीच्या जागेत भंगाराची समस्या कायम असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

दुसरीकडे या सोसायटीमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी पालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून वाहनांची बेकायदा पार्किंग केली जाते. त्यामुळे सोसायटीमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होतो.

सोसायटीच्या समोरच दुर्गंधीयुक्त गाडय़ा

शहरातील कचरा उचलण्यासाठी पालिकेमार्फत वापरण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या गाडय़ा ठेकेदारामार्फत नागरी वस्ती असलेल्या मुख्य रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात आहेत. यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होत असून यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे रहिवासी आणि येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या घाणीच्या वासामुळे नागरिकांचे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

मैदानावरील जप्त केलेले सामान चोरीला?

पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईत जप्त करण्यात आलेले सामान मैदानात ठेवून दिले आहे. मध्यंतरी पालिकेने जप्त केलेल्या सामानांची यादी करून हे सामान लिलावात काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावरही कोणतेच पाऊल उचलले गेले नसल्याने यामधील काही सामानांची चोरी भुरटय़ा चोरांकडून केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पालिकेला मैदानावरील भंगाराचे गोदाम आणि इतर समस्या याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु पालिकेतर्फे केवळ आश्वासन देऊन यावर कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे लागत आहे.

-योगेश पाटील, स्थानिक रहिवासी

नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यावर लक्ष देऊन उपाययोजना केल्या जातील. पालिकेने कारवाईत जप्त केलेले साहित्य सुरक्षित ठेवण्यात येईल. नियमानुसार त्या सामानाची विल्हेवाट लावता येणे शक्य असेल तशा सूचना केल्या जातील

-संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका