परिवहनच्या अंदाजपत्रकात आकर्षक घोषणा; ताफ्यात ४० नव्या बस आणणार

वसई : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाचे २०२०-२१ या वर्षांचे अंदाजपत्रक मंगळवारी परिवहन सभापतींना सादर केले. या अंदाजपत्रकात विविध आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत. वसई-विरारमधील रस्त्यांवर लवकरच विद्युत बसगाडय़ा धावणार असून त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सध्या महापालिकेच्या ताफ्यात १६० बसगाडय़ा आहेत. त्यापैकी १३० बसगाडय़ा मेसर्स भगिरथी ट्रान्सपोर्ट प्रा. लिमिटेड या ठेकेदाराच्या आहेत. शहरातील वाढते प्रदूषण आणि इंधनाची बचत करण्यासाठी विद्युत बसगाडय़ा आणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. त्यामुळे पालिकेचे स्वत: लक्ष नसते. त्यामुळे पालिकेने स्वत:चा नियंत्रण कक्ष उभारण्याचे ठरवले आहे. वसई-विरार महापालिका प्रशासनाने  सोमवारी परिवहन विभागाचे सुधारित अंदाजपत्रक ‘ब’ परिवहन समितीला  सादर केले. हे अंदाजपत्रक एकूण ७१ कोटी ८३ लाख एवढे आहे. त्यात एकूण खर्च ७० कोटी ८२ लाख एवढा दाखविण्यात आलेला आहे. हा अर्थसंकल्प १ कोटी रुपये शिलकीचा आहे. यावर्षी परिवहन खात्यात अनेक नवीन सुविधा आणि सुधारणा या अंदाजपत्रकात मांडण्यात आल्या आहेत. नवीन ४० बसचा ताफा, विद्युत बस, अत्याधुनिक परिवहन आगार, नवीन बस मार्गाची घोषणा या अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे. या अंदाजपत्रकावर परिवहन समितीकडून चर्चेनंतर सुधारणा केल्यानंतर स्थायी समितीमार्फत अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.

‘पर्यटन दर्शन’ बस बारगळली

महापालिकेची बससेवा ४३ मार्गावर चालते. यंदा ४० नव्या बस रस्त्यावर आणण्याचा संकल्प केलेला आहे. त्यानंतर नवीन मार्गावर सेवा देण्याचा मनोदय या अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. पालिकेने दोन वर्षांपूर्वी वसईचे पर्यटन घडविणारी पर्यटन बस सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र बसची मर्यादित संख्या लक्षात घेता यंदा ही सेवा योजना बारगळली आहे. बसची संख्या वाढल्यानंतर पर्यटन बस सुरू करण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

१३५ कोटींचे अत्याधुनिक परिवहन आगार

महापालिकेने विरार पश्चिमेच्या यशवंत नगर येथे १३५ कोटी रुपयांचे अत्याधुनिक परिवहन आगार बनविण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी यंदा ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील काही महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. पालिकेचे मुख्यालय या ठिकाणी स्थलांतरीत केले जाणार आहे.

१५ हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केलेली आहे. आतापर्यंत १५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्थानिक प्रभागातून मोफत पासचे वितरण करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी सांगितले. पालिकेतर्फे मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत प्रवास दिला जातो.

वसईच्या रस्त्यावर विद्युत बस सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रशासनाने जे अंदाजपत्रक सादर केले आहे, त्यावर चर्चा करून सुधारीत अंदाजपत्रक स्थायी समितीमध्ये सादर केले जाईल. या माध्यमातून नागरिकांना अधिकाअधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास योजननेमुळे परिवहनची प्रवासी संख्या वाढली आहे.

– प्रितेश पाटील, सभापती, परिवहन समिती, वसई-विरार महापालिका