म्हाडाच्या ५६० सदनिकांना मुकावे लागणार
विरारच्या बोळींज येथील म्हाडाची जागा वसई-विरार महापालिकेने मुस्लिम धर्मियांच्या दफनभूमीसाठी आरक्षित केल्याने येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५६० सदनिका रद्द होणार आहेत. तसेच या कब्रस्तानच्या मंजुरीलाही सात ते आठ वर्षांचा कालावधी लागणार असल्याने हा प्रश्नही अधांतरीत राहणार आहे.
वसई-विरार शहरात मुस्लीम धर्मीयांसाठी प्रशस्त कब्रस्तानची जागा नाही. गेली वीस वर्षे संघर्ष करून त्यांनी विरार येथील सव्‍‌र्हे क्रमांक ३७६ मध्ये क ब्रस्तानसाठी चार एकर जागा मिळवली होती. या जागेच्या आसपास रेल्वे स्थानक तसेच क्रीडा संकुल आहे. त्यामुळे कुणाचाच तसा विरोध नव्हता; परंतु बिल्डरांचे हित जपण्यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या कब्रस्तानचे आरक्षण बोळींज येथील म्हाडाच्या भूखंडावर हलवले. त्यामुळे या ठिकाणी म्हाडातर्फे बांधण्यात येणाऱ्या ५६० अत्यल्प गटातील सदनिका रद्द होणार आहे. त्याशिवाय म्हाडाच्या नऊ हजार घरांच्या सोडतीवर परिणाम होणार आहे. या प्रश्नावर सोमवारी झालेल्या महासभेतही विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आणि शिवसेना भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. कब्रस्तानेच आरक्षण पूर्ववत करण्याची विरोधकांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी सभागृहात गोंधळ घातला; परंतु त्याला दाद न दिल्याने हा सभात्याग करण्यात आला.
म्हाडाच्या मंजूर गृहनिर्माण प्रकल्पाच्या जागेवर कब्रस्तानाचे आरक्षण टाकून हा प्रकल्पावर परिणाम करण्याचा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी केला आहे. पूर्वीच्या जागेवर कुणाचीच हरकत नव्हती मग आरक्षण का हटवले, असा सवाल त्यांनी केला. विशेष म्हणजे हे आरक्षण मंजूर व्हायला अजून ७ ते ८ वर्षांचा कालवधी लागणार आहे. तोपर्यंत मुस्लीम बांधवांना नव्या कब्रस्तान पासून वंचित राहावे लागणार आहे, असा आरोप गावडे यांनी केला आहे.