हजारो होर्डिग, पोस्टर जप्त, शहर फलकमुक्त करण्यास सुरुवात

शहरात लावलेल्या बेकायदा होर्डिग, पोश्टर, फलक यांविरोधात वसई-विरार शहर महापालिकेने मोहीम उघडून शहर फलकबाजीमुक्त करायला सुरुवात केली आहे. हजारो बेकायदा होर्डिग आणि पोस्टर काढून टाकण्यात आली आहेत. यामुळे फलकबाजी करून चमकोगिरी करणाऱ्या गल्लीतल्या राजकीय नेते-कार्यकर्त्यांना लगाम बसला आहे.

वसई-विरार शहर स्वच्छ करून त्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी आयुक्त सतीश लोखंडे यांनी सुरुवात केली होती. त्याचाच भाग म्हणून शहर विद्रूप करणारे बेकायदा होर्डिग आणि पोस्टर काढण्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला. साहाय्यक प्रभाग समिती आयुक्त नीलम निजाई यांच्याकडे खास या कामाची जबाबदारी सोपवली. खासगी क्लीनअप मार्शलच्या मदतीने हे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी नऊ विशेष पथके तयार करण्यात आली. त्यांच्यामार्फत पोस्टर आणि होर्डिग काढले जात आहेत. त्यासाठी ते लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. त्यातील ५० टक्के रक्कम ही क्लीनअप मार्शलच्या ठेकेदाराला आणि पन्नास टक्के रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे.

या मोहिमेचा परिणाम म्हणून शहरातली फलकबाजी बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. बविआच्या नेत्यांनीही वाढदिवसानिमित्त छायाचित्र न लावण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. माझे जरी होर्डिग दिसले तरी कारवाई करून काढून टाका, असे महापौर प्रवीणा ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

लवकरच होर्डिग धोरण

नियोजनबद्धरीत्या होर्डिग्ज आणि पोस्टर लावून पालिकेचा महसूल वाढविण्यासाठी लवकरच होर्डिग धोरण अमलात आणणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त अजिज शेख यांनी दिली. या धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जागा निश्चित केल्या जातील. होर्डिग्जचा आकार कसा असावा ते ठरवले जाईल, असे ते म्हणाले.

फलकबाजीविरोधात नऊ पथके स्थापन करण्यात आली असून दररोज कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शेकडो बेकायदा होर्डिग काढून टाकले आहेत. गेल्या सव्वा महिन्यात तीन हजारांहून अधिक होर्डिग जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.

-नीलम निजाई, साहाय्यक प्रभाग समिती आयुक्त