दूषित वायू, दुर्गंधीचा प्रश्न कायमचा सुटणार; मिथेन वायू गोळा करण्याची प्रणाली विकसित

वसई : महापालिकेच्या कचराभूमीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. या कचराभूमीतून निघणाऱ्या विषारी धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आयोग्य धोक्यात आले आहे. यावर तोडगा म्हणून वसई-विरार महापालिकेने कचराभूमीत मिथेन वायू गोळा करण्याची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमुळे कचऱ्यातून निघणारा घातक मिथेन वायू गोळा केला जाणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

वसई-विरार महापालिका शहराच्या हद्दीतून दररोज ५३० मेट्रिक टन कचरा तयार होतो. हा कचरा वसई पूर्वेच्या गोखिवरे येथील कचराभूमीत टाकला जातो. गोखिवरे येथील १६ हेक्टर जागेवर पालिकेची कचराभूमी आहे. या कचऱ्यावर कुठलीच प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात कचऱ्यात मिथेन वायू तयार होऊन आगी लागत असतात. त्याच्या धुरामुळे रहिवाशांच्या त्रासात भर पडत आहे. या परिसरात हजारो लोक दररोज कामानिमित्त ये-जा करत असतात. शिवाय मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती आहे. त्या सर्वाना या दुर्गंधी आणि आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यात सतत आगी लागत असतात आणि ही कचराभूमी धुमसत असते. पावसाळ्यात पाण्यामुळे या कचराभूमीतून निघणारे सांडपाणी परिसरात पसरते आणि रहिवाशांचे जलस्रोत खराब होतात. यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

कचऱ्यातून विविध प्रकारचे विषारी वायू तयार होत असतात. कचरा कुजला तर हायड्रोजन सल्फाइड तयार होतो. कचरा जाळला तर कार्बनडाय ऑक्साइड तयार होत असतो, तसेच ओला कचरा आणि सुका कचरा यांच्यातील द्रव आणि घन पदार्थाचे संयोग होऊन मिथेन वायू तयार होत असतो.

घनकचरा व्यवस्थापन नसल्याने कचराभूमीत टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर कुठलीच प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे या वायूचे काय करायचे, असा प्रश्न पालिकेला पडला होता. भाभा अणुसंशोधन केंद्राचे (बीएआरसी) शास्त्रज्ञ डॉ. घोष यांनी हा मिथेन वायू गोळा करण्याची प्रणाली विकसित केली होती. महानगरपालिकेने त्यांच्याशी संपर्क साधून वसई-विरार महापालिकेच्या कचराभूमीवर ती राबविता येईल का याची विचारणा केली होती. घोष यांनी नुकतीच गोखिवरे येथील कचराभूमीला भेट देऊन पाहणी केली.

‘बीएआरसी’चे तंत्रसाहाय्य

या संपूर्ण प्रकल्पासाठीचे तंत्रसाहाय्य बीएआरसी करणार आहे. त्यामुळे पालिकेला फार खर्च येणार नाही, अशी माहिती प्रभारी साहाय्यक आयुक्त (आरोग्य) सुखदेव दरवेशी यांनी दिली. कचराभूमीवर दुर्गंधी आणि विषारी वायूचा प्रश्न यामुळे सुटू शकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कचराभूमीतून गोळा झालेला मिथून वायू बीएआरसीला विकत दिला जाणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे

काय करणार?

* किती कचरा जमा होतो, किती वायू तयार होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे.

* या कचऱ्यातून मिथेन वायू गोळा करण्याची प्रणाली गोखिवरे कचराभूमीत राबवणार आहेत.

* कचराभूमीवर पाइप लावून हा वायू गोळा केला जाणार आहे.

* हा मिथेन वायू गोळा करून तो विकला जाणार आहे.

* त्यासाठी कचराभूमीवर मिथेन युनिट बसवले जाणार आहेत.