भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेचा निर्णय; नवीन निर्बीजीकरण केंद्रालाही मान्यता

भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या वतीने शहरात श्वानांची शाळा उभारण्यात येणार आहे. आजारी असलेली आणि जर्जर झालेल्या भटक्या श्वानांचा सांभाळ व देखभाल या शाळेत करण्यात येणार आहे. त्याशिवाय शहरात आणखी एका श्वान निर्बीजीकरण केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार शहरात सध्या ३५ हजारांहून अधिक भटके श्वान आहेत, परंतु हा आकडा ७० हजार असण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे नवघर येथे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यात दररोज २० ते २५ श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते, परंतु हे केंद्र अपुरे पडत आहे. मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यासोबत झालेल्या बैठकीत श्वान निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा मागण्यात आली होती. तेव्हा पालघरच्या केळवे येथे पाच एकर जागा देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली, मात्र तेथे जाणे गैरसोयीचे ठरणार होते. त्यामुळे आता पालिकेने अनोखी शक्कल लढवली आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना श्वान निर्बीजीकरण केंद्र आणि श्वानांच्या शाळेसाठी जागा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागा देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेचे नाव त्या केंद्राला देण्यात येईल. जी भटकी श्वाने आजारी असतील, जर्जर झालेली असतील त्यांचा सांभाळ आणि देखभाल या शाळेत करण्यात येईल.

भटक्या श्वानांच्या उपद्रवावर आज बैठक

गेल्या आठवडय़ात अर्नाळा येथे १५ ते २० श्वानांनी एका आठ वर्षांच्या मुलीवर हल्ला चढवला आणि तिला गंभीर जखमी केले. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे भटक्या श्वानांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वसई-विरार महापालिकेने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी नवघरच्या श्वान निर्बीजीकण केंद्रात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत ‘द बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुअ‍ॅलिटी टू अ‍ॅनिमल’ या शासकीय संस्थेचा सहभाग असणार आहे. त्यात विविध वेटरनरी डॉक्टर सहभागी होणार आहे. आतापर्यंत किती श्वान दंशाच्या घटना घडल्या, किती श्वानांवर निर्बीजीकरण करण्यात आले, श्वानांची नेमकी संख्या किती याचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत.

अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे तसेच प्राणीप्रेमी यांच्याकडून जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागेवर प्रशस्त निर्बीजीकरण केंद्र आणि श्वानांची शाळा उभारली जाऊ  शकते. पालिकादेखील त्यांच्या स्तरावर जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

– सुखदेव दरवेशी, साहाय्यक आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका