तत्कालीन ठेकेदाराकडून आठ कोटींची वसुली बाकी

विरार :  वसई-विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन परिवहन सेवेच्या ठेकेदाराने शासनाचा बालक पोषण आहार कर आणि प्रवासी कराचा भरणा न केल्याने या शहरात धूळ खात असलेल्या बसेस आता परिवहन आयुक्तालयाच्या आदेशानुसार पालिका जप्त करून  त्याचा लिलाव करणार आहे.  तत्कालीन ठेकेदाराकडून जवळपास ८ कोटी रुपये कर भरणा बाकी आहे.

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या ५० हून अधिक बस नालासोपारा येथे धूळ खात पडल्या आहेत. या रिकाम्या बसेस गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा अड्डा बनले आहे. या बसेस जुन्या ठेकेदाराच्या नावाने असल्याने पाालिकेला त्या कार्यरत करता येत नव्हत्या. त्यामुळे पालिकेने या बस आता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्याचा ठराव  परिवहन आयुक्त यांच्याकडे पाठवला आहे.

वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा तत्कालीन ठेकेदार मेसर्स भगीरथ ट्रान्सपोर्ट या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जात होती.  या वेळी  १६० बस रस्त्यावर धावत होत्या.  त्यापैकी १३० बसेस या मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट प्रा. लिमिटेड या ठेकेदाराच्या मालकीच्या होत्या.  ठेकेदाराची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने आणि पालिका यामुळे अडचणीत येत असल्याने तसेच करोनाकाळात ठेकेदाराने आपली सेवा टाळेबंदी शिथिल झाल्यानंतरही सुरू केली नाही. यामुळे ठेकेदार आणि कर्मचारी यांत सातत्याने खटके उडत असल्याने पालिकेने त्याच्याबरोबरचा करार संपुष्टात आणला.  आणि जानेवारी २०२१ नव्या ठेकेदाराबरोबर करार करत पालिकेने परिवहन सेवा सुरु केली. पण तत्कालीन ठेकेदाराच्या बस आज धूळ खात पडल्या आहेत.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या धूळ खात असलेल्या बसची  मालकी तत्कालीन ठेकेदाराच्या नावावर आहे. त्यामुळे पालिकेला त्या बसेसची विक्री अथवा वापर करता येत नाही. याबाबत पालिकेने बसेस नावावर करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आम्ही मुंबई येथील राज्य प्रादेशिक परिवहन आयुक्त कार्यालयात  याबाबत तक्रार केली आहे.आयुक्त कार्यालयाकडून विशेष अधिकार घेऊन या बस उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून पालिकेच्या नावावर केल्या जातील. त्यानंतर नियमांनुसार विकण्याची प्रक्रिया केली जाईल. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून येत्या काही दिवसांतच या बसेस या परिसरातून हटविल्या जातील,  असे  प्रभारी  साहाय्यक आयुक्त परिवहन विश्वानाथ तळेकर  यांनी सांगितले.