वसईतील १५० अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना हुसकावणार;
दुर्घटना घडू नये म्हणून महानगरपालिकेची खबरदारी मोहीम
वसई-विरार शहरामध्ये तब्बल १५० अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले असले तरी रहिवासी घरांचा ताबा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून या इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढले जाणार आहे. पालिकेतर्फे अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांची यादी तयार केली जात असून तशा सूचना संबंधित पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
महापालिकेतर्फे शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांचीे वर्गवारी केली जाते. शहरात एकूण ४४२ धोकादायक इमारती आहेत. ‘सी १’, ‘सी २ ए’, ‘सी २ बी’, ‘सी ३’ अशी ही वर्गवारी असते. ‘सी २ ए’, ‘सी २ बी’, ‘सी ३’ या वर्गातल्या इमारतींना नोटिसा पाठवून दुरुस्त्या सुचविल्या जातात. डागडुजी करणे, दुरुस्ती करणे आदी सूचना पालिकेतर्फे इमारतींच्या रहिवाशांना केल्या जातात, परंतु ‘सी १’ म्हणजे अतिधोकादायक इमारती. त्या तात्काळ रिकाम्या करायच्या असतात. वसई-विरार शहरात १५० अतिधोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे २८ अतिधोकादायक इमारती या ‘आय’ प्रभागात आहेत. या इमारतींमध्ये शेकडो कुटुंबे राहतात. इमारतींची जीर्ण अवस्था पाहता त्या कुठल्याही क्षणी कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने या सर्व इमारतींना नोटिसा पाठवून तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश दिले होते, परंतु पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप या रहिवाशांनी इमारती खाली केलेल्या नाहीत. जर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती खाली केल्या नाहीत, तर स्थानिक पोलिसांचा आधार घेऊन रहिवाशांना इमारतीबाहेर काढून संक्रमण शिबिरात त्यांची व्यवस्था केली जाते. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पालिका खबरदारी घेत असते. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. अतिधोकादायक इमारतींच्या रहिवाशांना इमारतीबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहेत. शहरात संक्रमण शिबिरे नसल्याने येथील रहिवाशांना समाजमंदिर सभागृह, शाळा, मोकळ्या इतर इमारती यामध्ये पुनर्वसन केले जाणार आहेत. १५० इमारतींमध्ये किती कुटुंबे आहेत, कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे याची आकडेवारी गोळा करण्यात येत असून त्यानुसार त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे.
– बी. एम. माचेवाड, पालिकेचे कार्यकारी अभियंता

वसई-विरारमधील धोकादायक
इमारती
सी १ – १५०
सी २ – ८१
सी ३ – १०३
सी- ४ – १०८
एकूण ४४२