वसई-विरार महापालिकेकडून स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक

वसई-विरार महापालिकेने शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांची (क्लीनअप मार्शल) नेमणूक केली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकांणी अस्वच्छता केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणे, कचरा रस्त्यावरच टाकणे, सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करणे आदी प्रकार शहरात होत असून यांमुळे शहर अस्वच्छ होत आहे. आता अशा प्रकारची अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षकांची नेमूणक केली होती. यापूर्वीही महापालिकेने स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली होती, मात्र हा कारभार ठेका पद्धतीवर असल्याने त्यांना काढून टाकण्यात आले होते.

‘शहर स्वच्छ सर्वेक्षण २०१९’च्या तारांकित मानांकनामध्ये सहभागी होण्यासाठी २० ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत धोरण ठरवण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांची गजर असल्याने महापालिकेने नवीन प्रस्ताव मंजूर करून तीन वर्षांसाठी चार कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे.

शहरात १० नोव्हेंबरपासून स्वच्छता निरीक्षक कार्यरत झाले आहेत. तीन पाळय़ांमध्ये स्वच्छता दूत काम करणार आहेत. शहरातील नऊ प्रभाग समित्यांमध्ये ते काम पाहणार आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूचा परिसर, मुख्य रस्ते, रुग्णालये, आरोग्य केंद्र, मनोरंजन केंद्र, बस थांबे, शैक्षणिक संस्था, उपाहारगृहे या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक कार्यरत राहणार आहेत.

अस्वच्छता करणाऱ्यांवर दंड आकारला जाणार असून त्यातील ७० टक्के निधी महापालिकेला मिळणार असून उरलेला ठेकेदाराला देण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे स्वच्छतविषयक जनजागृती मोहीमही राबवण्यात येणार आहे.

दंडात्मक कारवाई

* सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रुपये

*  रस्त्यावर अंघोळ करणे – १०० रुपये

*  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मलमूत्र विसर्जित करणे – २०० रुपये

*  फेरीवाल्यांमार्फत होणारा कचरा – ५०० रुपये

*  पाळीव प्राण्यांपासून होणारा कचरा २०० रुपये

*  भिंतीवर जाहिरातपत्रके लावणे – २०० रुपये

* रस्त्यावर वाहन दुरुस्ती करणे – ५०० रुपये

वसई-विरार शहरातील रहिवाशांचे आरोग्य राखण्यासाठी आणि शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. त्यातून रहिवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होऊन त्यांना शिस्त लागेल. नेमण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षकांवरही लक्ष देण्यात येणार आहे.

– वसंत मुकणे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अधिकारी