वसई-विरार पालिका रुग्णालयाचा अजब कारभार; वॉर्डबॉयच करतोय डॉक्टरांची कामे

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य खात्याचा कारभार अनागोंदी असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा येथील पालिकेच्या रु ग्णालयात एका बेडवर चक्क दोन रुग्णांना झोपवून उपचार केले जात आहेत, तर चक्क टाके घालण्याचे काम वॉर्डबॉय करत असल्याचे अजब चित्र आहे. या रुग्णालयात रुग्णांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे असे प्रकार म्हणजे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे, अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

नालासोपारा पूर्वेच्या नगिनदास पाडा येथे दीड वर्षांपूर्वी वसई-विरार महापलिकेने रुग्णालय उभारले आहे. १०० खाटांचे हे रुग्णालय असल्याचे सांगण्यात आले होते, पंरतु प्रत्यक्षात हे रुग्णालय केवळ ६० खांटाचेच असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना एकाच खाटेवर दोन जणांना झोपवून उपचार केले जातात तर काहींना खाली जमिनीवर झोपवले जाते, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. अनेकदा रुग्णालयातील वॉर्डबॉय ड्रेसिंग आणि स्टिचेस (टाके) घालण्याचे काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे, उपचारांसाठी प्रतिक्षा करावी लागणे या बाबी नित्याच्याच असल्याचेही नातेवाईक सांगतात. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांनी असा प्रकार होत असल्याचे मान्य केले. परंतु या पुढे एकाच खाटेवर दोन रुग्णांवर उपचार करण्यात येऊ नये तसेच वॉर्डबॉयना ड्रेसिंग आणि स्टिचेसचे काम देऊ नये, अशा सक्त सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

‘डॉक्टरांची कमतरता नाही’

अनेक वॉर्डबॉय हे मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातून आलेले आहेत. त्यांना या कामाचा अनुभव असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णांना उपचारासाठी विलंब होऊ नये म्हणून ते स्टीचेस, ड्रेसिंग करतात, असे डॉ. राणे यांनी सांगितले. या रुग्णालयात २९ डॉक्टर आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो हा आरोप मात्र त्यांनी फेटाळून लावला. वाढत्या लोकसंख्येमुळे  आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे छोटी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे उभारण्याचे काम सुरू आहे, असेही डॉ. राणे यांनी सांगितले.

या रुग्णालयात रुग्णांची सतत वर्दळ असते. सध्या ८० खाटा आहे. परंतु सामान्य विभागामध्ये उपचारासाठी गर्दी होत असल्याने एकाच खाटेवर दोन रुग्णांना झोपवून उपचार करावे लागत होते. खाटांची संख्या कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या विनतींवरून दोन रुग्णांना एकाच खाटेवर झोपवले जात असे. पण यापुढे असे प्रकार होणार नाहीत, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

– डॉ. अनुपमा राणे, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका.