26 September 2020

News Flash

पालिकेची परिवहन सेवा नादुरुस्त

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड; २६ चालक निलंबित

|| कल्पेश भोईर

दररोज १० ते १२ बसमध्ये बिघाड; २६ चालक निलंबित

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खिळखिळी झाली असून दररोज परिवहनच्या बस बंद पडत असल्याचे चित्र आहे. दररोज १० ते १२ बस नादुरुस्त होत असल्याचे परिवहन विभागाच्या व्यवस्थापकांकडूनच सांगण्यात आले. अनेक बसचालक भरधाव बस चालवत असून परिवहन विभागाने २६ बसचालकांना निलंबित केले असून ३८ जणांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.

बसई-विरार महापालिकेच्या बस धूर ओकणाऱ्या आणि खिळखिळ्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाहनचालक वाहने भरधाव आणि बेदरकारपणे चालवत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. गेल्या सहा वर्षांत पालिका परिवहनचे ४४ मोठे अपघात झाले असून त्यात १८ जणांचे बळी गेले, तर २६ जण जखमी झाले. पालिकेने मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी ठेकेदारामार्फत परिवहन सेवा सुरू केली होती. परिवहन सेवेत एकूण १४९ बस कार्यरत असून त्यामध्ये ३० महापलिकेच्या तर ११९ भागीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आहेत. दररोज १३८ बस रस्त्यावर धावतात, तर त्यांच्या एकूण ८०० फेऱ्या होतात. मात्र अनेक बस रस्त्यात मध्येच बंद पडतात, अशी तक्रार प्रवाशांनी केली आहे. परिवहन सेवेच्या बस धूर ओकणाऱ्या आणि योग्य दर्जाच्या नसल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले. बहुतांश बसची इंजिन बंद पडत असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

महापालिकेचे परिवहन सेवेवर पूर्ण नियंत्रण आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. आम्ही तक्रारींचे निरसन करून नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.    – संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

प्रवाशांकडून तक्रारी

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. २० दिवसांत ३२ तक्रारी व सूचना आल्या आहेत. बस वेळेवर न पोहोचणे, चालकांचे उर्मट वर्तन, भरधाव गाडी चालवणे, बसमधील आसन व्यवस्था नीट नसणे, स्थानकाच्या पुढे बस थांबवणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे, असे परिवहन सेवेचे आगार व्यवस्थापक तुकाराम शिवभक्त यांनी सांगितले.

चालकांना बस कमी वेगाने आणि नियमांचे पालन करून चालविण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. भविष्यात असे अपघात घडू नये म्हणून ठोस उपाययोजना केल्या जातील.     – प्रितेश पाटील, सभापती, परिवहन

कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ  नये यासाठी प्रत्येक वाहनचालकाला योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. अपघातग्रस्तांना परिवहन विभागाच्या वतीने भरपाई देण्यात आली आहे.     – मनोहर सकपाळ, संचालक, मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट

विविध तांत्रिक कारणांमुळे दररोज १० ते १२ बसेस नादुरूस्त होत असतात. धूर ओकणाऱ्या ३० बस होत्या. त्या आम्ही बदलल्या आहेत.   – तुकाराम शिवभक्त, व्यवस्थापक, परिवहन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 12:47 am

Web Title: vasai virar municipal transport service
Next Stories
1 पाणीदेयकांमध्ये घोटाळा
2 रुग्णसेवेसाठी दानसक्ती!
3 लोकवर्गणी, श्रमदानातून आठ दिवसांत बंधारा
Just Now!
X