पाच वर्षांपासून अहवालच नाही

विरार :  वसई-विरारमध्ये  शहरीकरणाबरोबरच  प्रदूषणाची समस्या वाढत आहे. शहरात वाढती वाहने आणि सिमेंटीकरण यामुळे दिवसागणिक पर्यावरणाचा समतोल ढासळून प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. असे असतानाही वसई-विरार महानगरपालिका मात्र शहराच्या पर्यावरणाविषयी उदासीन आहे. मागील सहा वर्षांत शहराचा पर्यावरण अहवाल काढलाच नाही.  शहरातील प्रदूषणाच्या बाबतीत कोणतीही माहिती नसल्याने पर्यावरण संवर्धनासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत.

मागील काही वर्षांत वसई-विरार  परिसरांत मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचे आणि उद्योगधंद्यांचे जाळे उभारले आहे, तर दुसरीकडे वाढते नागरीकरण यामुळे वसई विरारचा पर्यावरण स्थर ढासळत चालला आहे, पण पालिका याबाबत जागृत नसल्याने  पालिकेच्या या निष्क्रिय कारभारावर पर्यावरणप्रेमींकडून कडाडून टीका केली जात आहे.

शहरातील वाढती बांधकामे, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी ही एरव्ही सहज लक्षात न येणारी कारणेही पर्यावरणाच्या ऱ्हासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यातच वसई पूर्व पट्ट्यातील केमिकल कंपन्यांचे प्रदूषण प्रकरण दर दिवशी गाजत आहे. यावर पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करते, परंतु प्रदूषण मंडळाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने कारवाई होताना दिसत नाही, तर पालिकेकडे या संदर्भातली कोणतीही  यंत्रणा नाही.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या सततच्या बदलाने आणि करोनाकाळात वाढलेल्या रस्ते वाहतूक आणि रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे  शहरामध्ये धुळीची चादर निर्माण होत आहे. मुख्यत्वे महामार्गावर याचा अनुभव पाहायला मिळत आहे. ही चादर इतकी दाट असते की, वाहनचालकाला रात्रीच्या वेळी धूलिकणांमुळे रस्ता दिसत नसल्याने अपघातांच्या शक्यता वाढत आहेत.

शहरात प्रदूषणासंदर्भात इतके गंभीर विषय असतानाही पालिकेच्या संकेतस्थळावर मात्र पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल २०१३-१४ व २०१४-१५ चाच अहवाल दाखवला जात आहे, तर आतापर्यंत पालिकेने पर्यावरण अहवाल काढलाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका गेल्या चार वर्षांपासून पर्यावरण अहवालाविना काम करताना दिसतेय.

विशेष म्हणजे पालिकेकडून दरवर्षी जाहीर होणारा पर्यावरण अहवाल हा शहरातील पर्यावरणाची सध्याची स्थिती दर्शवत असतो. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर पालिका वेळप्रसंगी कारवाईचा बडगा उगारते, या संदर्भातील माहितीही या अहवालातून मिळत असते. त्यामुळे शहरात पर्यावरणाची हानी करणाऱ्यांमध्ये कायद्याचे पालन करण्याची मानसिकता वाढू शकते. मात्र पालिका दरवर्षीचा अहवालच काढत नसल्याने प्रदूषणाने तर सीमाच गाठली असेल, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

वाहतूक आणि रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे  शहरामध्ये धुळीची चादर निर्माण होत आहे. मुख्यत्वे महामार्गावर याचा अनुभव पाहायला मिळत आहे. दरम्यान, आतापर्यंत पालिकेने पर्यावरण अहवाल काढलाच नसल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात सध्या माहिती नाही, यामुळे यावर काही माहिती देऊ शकत नाही, पण लवकरच माहिती घेऊन पर्यावरण अहवाल तयार  करण्यासाठी काम केले जाईल. –  दीपक कुरळेकर, उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका