वसई-विरार शहरात दिवसभरात १०७ मिलिमीटर पावसाची नोंद

वसई : वसई-विरार शहरात सलग चौथ्या दिवशा पावसाची संसतधार सुरूच होती. गुरुवारी शहरात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना सुरूच होत्या.

गेल्या चार दिवसांपासून वसईत मुसळधार पाऊन सुरू आहे. गुरुवारी सकाळी पावसाने उसंत घेतल्यानंतर दुपारनंतर पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील सर्व सखल भाग पाण्याखालीच होता. अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते आणि वाहतूक कोंडी पहायला मिळाली. शहरात दिवसभरात दोन ठिकाणी आगी लागण्याच्या तुरळक घटना घडल्या. सनसिटी आणि दिवाणमान येथे लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले, तर तब्बल १५ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे मागील चार दिवसांत ७० झाडे कोसळली. मात्र कुठलीही दुर्घटना घडली नाही.

महापालिकेने सखल भागातील आपत्ती निवारण पथक सज्ज ठेवले होते. सायवन येथील पांढरतळा पूल गुरुवारीही पाण्याखालीच होता. नदीला पूर आल्याने पाणी पुलाच्या वरून जात होते. त्यामुळे गावात जाण्यासाठी ग्रामस्थांना पर्यायी रस्त्यावरून जावे लागत होते. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील अनेक भागांत पाणी शिरले होते. नालासोपारा पूर्वेकडील परिसर आजही जलमय होता. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. विजेचा लंपडाव सुरूच असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

वसईतील पर्जन्यमान

(मिलिमीटरमध्ये)

* मांडवी          ९३

* आगाशी        १३८

* निर्मळ          १०८

* विरार            १४३

* माणिकपूर     ९३

* वसई              ६५