21 September 2018

News Flash

पाणी इथले ओसरत नाही!

बुधवारी पाऊस थांबला तरी पाणी ओसरलेले नव्हते. गुरुवारीही अनेक भागात तीच स्थिती होती.

वसई-विरार पाचव्या दिवशीही पाण्यातच; पाणी उपसण्यासाठी पालिकेकडे उपाययोजनाच नाही

HOT DEALS
  • Gionee X1 16GB Gold
    ₹ 8990 MRP ₹ 10349 -13%
    ₹1349 Cashback
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 24790 MRP ₹ 30780 -19%
    ₹4000 Cashback

वसई : ‘पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची?’ अशीच अवस्था सध्या वसई-विरारच्या रहिवाशांची झाली आहे. सलग पाचव्या दिवशी हे शहर पाण्यातच आहे. पाऊसही थांबला असला तरी या शहरातून पाणी ओसरायचे नावच घेत नाही. विशेष म्हणजे या शहराची जबाबदारी असलेले पालिका प्रशासन याबाबत ढिम्म आहे. पालिकेकडे पाणी उपसण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याचे चित्र आहे.

शनिवारपासून सुरू झालेला पावसाने वसईत सर्वत्र पाणी साचले. बुधवारी पाऊस थांबला तरी पाणी ओसरलेले नव्हते. गुरुवारीही अनेक भागात तीच स्थिती होती. वसई पूर्वेच्या एव्हरशाईन नगरी येथील पाणी ओसरले, मात्र नालासापोरा, विरारच्या काही भागात अजूनही पाणी साचलेले आहे.  छेडा नगर, हनुमान नगर, सेंट्रल पार्क, मंगल प्लाझा, विरार पश्चिमेकडे सेंट्रल पार्क, विराट नगर, बोळींज, रानपाडा हा परिसर गुरुवारीही पाण्याखाली होता. वसईतील सनसिटी रस्ता अद्यापही पाण्यात गेला होता. सनसिटी पुढील गास गाव अद्यापही पाण्याखाली असून संपूर्ण गावकरी गावातच बंदिस्त झाले आहेत. चुळणे गावातील घराघरात पाणी शिरले असून लोकांचे नुकसान झाले आहे.

पालिका ढिम्म

वसई-विरार शहरात पाणी भरले असले तरी पाणी बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासन काहीच करत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने साचलेले पाणी काढण्यासाठी कुठल्याही उपाययोजना न केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ‘गेली ३० वर्षे मी वसईत राहत असून एवढी बिकट परिस्थिती मी पाहिली नव्हती,’असे वसईतील समता नगर येथे राहणारे राजाराम मुळीक यांनी सांगितले. पाणी काढण्यासाठी पालिकेचे कुठलेही अधिकारी, कर्मचारी फिरकत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जनजीवन पूर्वपदावर

तीन दिवसांनंतर बऱ्यापैकी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तीन दिवसानंतर लोक कामावर जायला निघाले, परंतु अनियमित ट्रेनचा फटका त्यांना बसला. ३६ तासानंतर बुधवारी संध्याकाळी वीज आली, मात्र त्यात सातत्य नव्हते. अनेक भागातील वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. आम्ही गास गावातील रहिवासी गावातच अडकून पडलेलो आहोत. गावात चार फूट पाणी शिरले आहे. गुरुवारी दुपारी आमच्याकडे वीज आली. मात्र आम्ही गावाबाहेर पडू शकत नसल्याने आमचा बाहेरच्यांशी संपर्क तुटल्याचे गासमधील अ‍ॅड. जिमी घोन्साल्विस यांनी सांगितले.

पंचनामा करण्याऐवजी केवळ छायाचित्रे काढली

वसई : वसईतील पुरानंतर तहसीलदारांकडून गुरुवारी पंचनामे करण्यात आले. मात्र वरवर पंचनामे करून औपचारिकता केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वसईतील नाळे भागातही लोकांना फारच त्रास सहन करावा लागला. येथे नाळा, बोडण नाका, पसायदान सेंटर, भाऊसाहेब वर्तक शाळा आणि जवळच्या नानभाट भागात रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचले होते. त्यामुळे बस वाहतूक बंद होती, त्याचबरोबर येथील  शाळाही बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. अशा परिस्थितीत वेळीच गटारातील अडथळे दूर करून मदत करण्यास कोणीही पुढे आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गुरुवारी तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी पंचनामे करण्यासाठी आले, मात्र केवळ छायाचित्रे काढून निघून गेले, असा आरोप ग्रामस्थ चार्ली रोझारियो यांनी केला आहे. त्यांनी खोलात जाऊन चौकशी करणे, नुकसानीची माहिती घेणे आणि त्याचे जाब-जबाब नोंदवून अशा घटनेचा पंचनामा करणे आवश्क होते. मात्र तसा पंचनामा केला गेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

अद्यापही पाण्याखाली असणारी ठिकाणे

नालासोपारा :

छेडा नगर, हनुमान नगर, बसडेपो परिसर, नालासोपारा पोलीस ठाणे, सेंट्रल पार्क, मंगल प्लाझा

विरार :

विरार पश्चिम सेंट्रल पार्क, विराट नगर, बोळींज, रानपाडा

वसई

सनसिटी, गास गाव, चुळणे, दिवाणमान, समता नगर. डीजी नगर.

First Published on July 13, 2018 1:58 am

Web Title: vasai virar still under water after fifth day