पालिकेची सनसिटीसाठीची बस फेरी रद्द; प्रवाशांना आर्थिक भुर्दंड    

सर्वसामान्य जनतेला सेवा देण्याचा दावा वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा करत असली तरी त्यांचा दावा प्रत्यक्षात किती पोकळ आहे ते पुन्हा एकदा दिसून आले आहे. वसई पश्चिमेला सनसिटी येथील बसची फेरी परिवहन सेवेने रद्द केली आहे. याचा फटका या परिसरातील हजारो नागरिकांना आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बसला आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहनसेवा खासगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पालिकेची परविहन सेवा आहे. मात्र या परिवहन ठेकेदाराने सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत फायद्याची असणारी सनसिटी येथील बस सेवा रद्द केली आहे. वसई पश्चिमेला सनसिटी हा परिसर आहे. या भागात सेंट फ्रान्सिस शाळा, सेंट पीटर शाळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे. दररोज हजारो विद्यर्थी या शाळा आणि महाविद्यालयांत येत असतात. परंतु आता पालिकेची बस नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना वसई स्थानकातून चालत अथवा रिक्षाने यावे लागते. या भागात येण्यासाठी ‘शेअर रिक्षा’ नसल्याने ‘स्पेशल रिक्षा’ करून यावे लागते. त्याचे भाडे ३५ रुपये होते. पालिकेची बस नसल्याने नागरिकांना नाहक हा भुर्दंड     सहन करावा लागत आहे.

आमच्या महाविद्यालयात चार हजारांहून अधिक विद्यार्थी शिकतात. शिवाय परिक्षा केंद्र असल्याने दहावी-बारावीसह होणाऱ्या विविध परीक्षांसाठी हजारो विद्यर्थी येत असतात; परंतु वसई स्थानकापूसन शेअर रिक्षा नसल्याने त्यांना ३५ रुपये खर्चून ‘स्पेशल रिक्षा’ने यावे लागते असे डा.ॅ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गायकवाड यांनी सांगितले. पालिकेच्या परिवहन सेवेची बस होती. तेव्हा मोठा आधार होता. पण ती बस अचानक बंद केल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा भुर्दंड  बसू लागला आहे, असेही ते म्हणाले. ‘स्पेशल रिक्षा’च्या नावाखाली ग्राहकांची होणारी लूट आणि बस नसल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत असे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष शंकर बने यांनी सांगितले. नफा-तोटय़ाचा विचार न करता या भागाची बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

‘बस संख्या अत्यल्प’

सनसिटी येथील बस बंद केल्याचे परिवहन ठेकेदार मनोहर सतपाळ यांनी मान्य केले. आम्ही या भागात सुरुवातील आठ महिने बस सेवा दिली होती; पंरतु प्रवासी बसऐवजी रिक्षात बसत होते. त्यामुळे आम्हाला तोटा होत होता. शिवाय आमच्याकडे बसची संख्याही कमी आहे. बसेसची संख्या वाढली की पुन्हा या भागात बस सुरू करू, असे ते म्हणाले.