जलशुद्धिकरण केंद्रात पाणी घुसल्याने यंत्रणा ठप्प

वसई : मुसळधार पाऊस आणि पालघरमध्ये आलेल्या पुरामुळे वसईकरांवर आता पाणीसंकट कोसळले आहे. वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या मासवण आणि धुकटण जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घुसल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे वसई-विरार शहरातील पाणीपुरवठा बंद झाला आहे.

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या हे महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून दररोज वसई-विरार शहराला २०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. या पाण्याचा पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण करण्याची केंद्रे ही पालघर जिल्ह्य़ातील मासवण आणि धुकटण येथे आहेत.

दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस सुरू आहे. २८ ते ३० जून या कालावधीत ५०४ मिलिमीटर एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. सूर्या नदीस पूर आल्याने मनोरकडून मासवण पालघरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मासवण येथील उदंचन केंद्रात तसेच धुकटण येथील जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी साठले आहे. पुराच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा उदंचन विहिरीत साठल्यामुळे पंपाद्वारे पाणी ओढण्यास अडचणी निर्माण होत आहे.

या भागात असलेल्या नदीनाले आणि सखल भागात असलेल्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रेही पाण्याने वेढली गेली आहेत. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

प्रवाह मोठा आहे. त्यामुळे पाणी संपूर्ण घुसले आहे. परिणामी जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भर पावसात वसई-विरारकरांना घरात पाण्यावाचून राहावे लागत आहे.

संततधार पावसाने मासवण आणि धुकटण येथील केंद्र पाण्याखाली गेल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्या ठिकाणी दुरुस्तीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

– माधव जवादे, शहर अभियंता वसई-विरार पालिका